"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी या श्वानाला घेऊन त्यांच्या गाडीतून संसदेत पोहचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावरून आता भाजप नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "काँटनेवाले अंदर बैठे हैं", असे म्हणत खासदार रेणुका चौधरी यांनी सरकारवर निशाणा साधला.
"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी
Published on

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी (दि.१ डिसेंबर) पासून सुरूवात झाली. या अधिवेशनात दिल्लीतील स्फोट, वायू प्रदूषण व मतदार यादी विशेष पुनरावलोकनावरून (एसआयआर) विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. दरम्यान, काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी या श्वानाला घेऊन त्यांच्या गाडीतून संसदेत पोहचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावरून आता भाजप नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "काँटनेवाले अंदर बैठे हैं", असे म्हणत खासदार रेणुका चौधरी यांनी सरकारवर निशाणा साधला.

कुत्रा आणू नये असं कुठे लिहिलंय?

संसदेत श्वान आणल्याच्या कृतीवरून टीका होत असताना खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या, “यात वाद काय आहे? कुठे असा नियम आहे की, कुत्रा आणू नये? मी संसदेकडे येत होते. रस्त्यात एक स्कूटर गाडीला धडकली आणि एक छोटं पिल्लू मधोमध भटकत होतं. ते गाडीने चिरडले जाईल म्हणून मी उचलून माझ्या कारमध्ये ठेवले. संसदेत पोहचल्यावर कार परत गेली तेव्हा पिल्लूही घरी पाठवलं. मग यात वाद काय?” असा सवाल रेणुका चौधरी यांनी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या, “त्यांना प्राणी आवडत नाहीत? वाह सरकार! एक मुका प्राणी चुकून एखाद्या वाहनात शिरला तर त्यांना एवढा त्रास का होत आहे? कुठे चावणारा कुत्रा दिसला का? जे चावतात ते कुत्रे नाहीत… ते तर संसदेत बसलेले आहेत. मी पिल्लू घरी पाठवून सांगितलं की, त्याची काळजी घ्या. पण जे रोज संसदेत बसून आम्हाला ‘चावतात’, त्यांच्यावर कोणी आवाज उठवत नाही", असा हल्लाबोल रेणुका चौधरी यांनी केला.

संसद ही रचनात्मक चर्चेचे व्यासपीठ नाटक करण्याचे नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले होते की, "संसद हे रचनात्मक चर्चेचे व्यासपीठ असले पाहिजे, नाटक करण्याचे मंच नाही." त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले.

ड्रामा कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकायचं का?

“आता ‘ड्रामामास्टर’ आम्हाला शिकवणार? कधी आणि कसा ड्रामा करायचा हे आम्ही त्यांच्याकडून शिकायचं का? आम्हाला हे जमत नाही, कारण आम्ही मनापासून काम करतो आणि जमिनीवर राहून काम करतो... आता तर ते सायकोलॉजिस्ट, कन्सल्टंटही झालेत; आणखी एक पदवी जोडली त्यांनी...” असे म्हणत रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

प्रत्येकाशी आदराने आणि सन्मानाने वागलं पाहिजे

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या, “संसदेच्या आवारात या पवित्र मंदिरात, जे देशातील सर्वात उच्च संस्था आहे. विविध राज्यांतून आणि मतदारसंघांतून निवडून आलेले खासदार बसतात. लोकांचा विश्वास आणि श्रद्धा आम्ही इथे प्रतिनिधित्व करतो. पक्ष कोणताही असो, प्रत्येकाशी आदराने आणि सन्मानाने वागलं पाहिजे. अशा ठिकाणी रेणुका चौधरी यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. हे वक्तव्य त्यांच्या वैयक्तिक मानसिकतेचेच प्रतिबिंब आहे, असे मला वाटते.”

logo
marathi.freepressjournal.in