Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप

Ashwin Mushran Goa accident : गोव्यात अभिनेता अश्विन मुशरानच्या कारची चुकीच्या दिशेने जात असताना दुचाकीला धडक होऊन बाप-लेक गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर मदतीऐवजी अश्विन आणि स्थानिकांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप
Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप
Published on

गोवा : 'लगे रहो मुन्नाभाई', 'फॅशन' आणि 'देसी बॉईज'सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता अश्विन मुशरान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शनिवारी गोव्यात अश्विनच्या कारची चुकीच्या दिशेने जात असताना एका दुचाकीला जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ झाला. अश्विन आणि त्याच्या पत्नीचा स्थानिकांशी वाद झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोव्यात नेमकं काय घडलं?

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी (दि.१५) रोजी दुपारी गोव्यातील केपे तालुक्यातील कुसमण, क्वेपेम परिसरात हा अपघात झाला. अश्विन आणि त्याची पत्नी कारमधून प्रवास करत होते. याचदरम्यान त्यांच्या कारची दुचाकीला धडक झाली. दुचाकीवर बाप-लेक होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, कार चुकीच्या बाजूने जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडकेत दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यापैकी एकाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने संबंधितावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

चालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघाताच्या वेळी कार अश्विनचा ३२ वर्षीय चालक वसंत पुत्तप्पा लमन चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी वसंतविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास क्वेपेम पोलिसांकडून सुरू आहे.

अपघातानंतर घटनास्थळी वाद

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. यावेळी अश्विन मुशरान आणि त्याच्या पत्नीचा स्थानिकांशी वाद झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्थानिक प्रतिनिधी अमोल काणेकर यांनी या घटनेबाबत काही गंभीर आरोप केले आहेत. अपघातानंतर जखमींची मदत करण्याऐवजी अश्विन आणि त्याची पत्नी स्थानिकांशी वाद घालत होते, असा दावा त्यांनी केला. तसेच दोघे काही वेळाने एका पार्टीला जाण्यासाठी घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘माझ्यावर थुंकले’ असा आरोप; पोलिसांचं काय म्हणणं?

वादादरम्यान अश्विनच्या पत्नीने आपल्यावर थुंकल्याचा आरोप अमोल काणेकर यांनी केला आहे. मात्र, या आरोपाला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता आणि दोन्ही बाजूंकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्या.

घटनेनंतर स्थानिकांनी अश्विनची कार रोखून धरल्याचेही सांगितले जाते. त्यानंतर अश्विन मुशरान पुन्हा घटनास्थळी आला आणि त्याने उपस्थितांची माफी मागितल्याचा दावा करण्यात आला आहे.

अभिनेत्याची प्रतिक्रिया काय?

या संपूर्ण प्रकरणावर अश्विन मुशरानने माध्यमांशी बोलताना, सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याने अधिक भाष्य करणार नसल्याचे सांगितले. तसेच या घटनेला चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे अपघाताची नेमकी परिस्थिती आणि त्यामागची जबाबदारी तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फॅशन’सह अनेक चित्रपटांत काम

अश्विन मुशरान हा अभिनेता आणि व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फॅशन’, ‘देसी बॉईज’, ‘मैं तेरा हीरो’, ‘शहजादा’ आणि ‘क्विक गन मुरुगन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. ‘क्विक गन मुरुगन’मधील डॉ. जॅंगोच्या भूमिकेमुळेही त्याची विशेष चर्चा झाली होती. अलीकडे तो ‘हॅप्पी पटेल’ या चित्रपटातही दिसला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in