पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे तब्बल ५,५३६ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. मात्र, या सोहळ्यात फक्त विकासाच्या योजनांचीच नव्हे, तर देशाच्या सुरक्षेविषयी त्यांच्या स्पष्ट भूमिका आणि पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांवरील घणाघाती भाषणानेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
मोदींनी आपल्या भाषणात देशातील वाढत्या राष्ट्रप्रेमाची लाट आणि जनतेत जागृत झालेल्या देशभक्तीचा उल्लेख करताना सांगितले, "मी गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये आहे. जिथे जिथे गेलो, तिथे लोकांच्या डोळ्यांत मातृभूमीबद्दलचे प्रेम आणि तिरंग्यावरील अभिमान स्पष्ट दिसत होता."
सरदार पटेल यांचे ऐकले असते तर..
पंतप्रधान मोदींनी इतिहासाचा दाखला देत १९४७ मध्ये भारताचे विभाजन, काश्मीरवर झालेला पहिला दहशतवादी हल्ला, आणि पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉरचा मुद्दा उपस्थित केला. "शरीर कितीही बळकट असले तरी एक छोटा काटा वेदना देतोच... आणि तो काटा म्हणजे पीओके (पाक-अधिकृत काश्मीर)," असे म्हणत त्यांनी सूचित केले की भारताने त्या वेळी योग्य निर्णय घेतला असता, तर गेल्या ७५ वर्षांचा दहशतवादाचा इतिहास टळला असता.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "जर त्या दिवशी सरदार पटेलांचा सल्ला मानला गेला असता, तर पीओके आपल्याकडे असता आणि हजारो जवानांचे बलिदान टळले असते."
दहशतवादाविरोधातील कारवाया आणि पाकिस्तानची भूमिका
पंतप्रधान मोदींनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणावर प्रकाश टाकताना सांगितले की, "जेव्हा २२ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तेव्हा प्रत्येक कृती कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्यामुळे कोणालाही पुराव्याची गरज नाही. पाकिस्तानने स्वतःच त्या दहशतवाद्यांना स्वत:च्या देशाचा ध्वज लावलेल्या शव पेट्यामध्ये सन्मान दिला आहे, हेच पुरावा म्हणून पुरेसं आहे."
त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताची ही कारवाई कोणतीही प्रॉक्सी वॉर नसून पाकिस्तान विरोधातली ठोस युद्धनीती आहे. ते म्हणाले कि या मुजाहिदीनच्या तोंडाला रक्त लागले आहे. ही प्रवृत्ती गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगाममध्येही त्याचे विकृत स्वरूप अस्तित्वात होते. आम्ही हे ७५ वर्षे सहन केले. जेव्हा जेव्हा पाकिस्तानशी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा भारताच्या लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानला समजले की ते युद्धात भारताला हरवू शकत नाहीत. म्हणूनच त्याने प्रॉक्सी वॉरचा अवलंब केला. त्याने दहशतवादी तयार करण्यास सुरुवात केली. त्यांना भारतात पाठवायला सुरुवात केली. पहलगाममध्येही त्यांनी तेच केले. असे म्हणत पळकुट्या पाकिस्तानवर त्यांनी निशाणा साधला.
सिंधू पाणी करारावरही ताशेरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला नवीन पिढीला सांगायचे आहे की आपला देश कसा उद्ध्वस्त झाला. १९६० च्या सिंधू पाणी कराराचा अभ्यास केला तर तुम्हाला धक्का बसेल. जम्मू आणि काश्मीरच्या नद्यांवर बांधलेले धरण स्वच्छ केले जाणार नाही असा निर्णय तेव्हा घेण्यात आला. कोणतेही गाळ काढण्याचे काम केले जाणार नाही. घाण साफ करण्यासाठी खालचे दरवाजे बंद राहतील. हे दरवाजे ६० वर्षे कधीच उघडले गेले नाहीत. जे जलाशय १००% क्षमतेने भरले पाहिजेत ते आता फक्त २% किंवा ३% पर्यंत मर्यादित आहेत. पण धरण १०० टक्के भरायच्या आधीच तिथे पूर आला. सध्या मी काहीही केले नाही तरीपण तिकडे लोकांना घाम फुटलाय. आम्ही तर फक्त धरण स्वच्छ करण्यासाठी छोटे दरवाजे उघडले आहेत.
वसुधैव कुटुंबकम आणि सामर्थ्याचा संगम
आपल्या संस्कृतीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, "वसुधैव कुटुंबकम ही आपली परंपरा आहे, पण जर कुणी आपल्या घरावर कुरघोडी केली, तर भारत शांत बसेल असा भ्रम कोणीही ठेवू नये." ते म्हणाले की, "हा देश वीरांचा आहे आणि प्रत्येक आव्हानाला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे."
मी पहिल्यांदा पंतप्रधान झालो तेव्हा अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी -
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'काल २६ मे होता. २६ मे २०१४ रोजी मला पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या क्रमांकावर होती. आपण कोरोनाशी लढलो, आपल्या शेजाऱ्यांकडून येणाऱ्या समस्यांना तोंड दिले, नैसर्गिक आपत्तींनाही तोंड दिले, तरीही इतक्या कमी वेळात आपण ११ व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो. कारण आपल्याला विकास हवा आहे, आपल्याला प्रगती हवी आहे. आमचे ध्येय आहे... २०४७ मध्ये भारताचा विकास झाला पाहिजे. आपण स्वातंत्र्याची १०० वर्षे अशा प्रकारे साजरी करू की जगात भारताच्या विकासाचा ध्वज फडकत राहिला पाहिजे.