'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

मध्य प्रदेशातील NEET परीक्षार्थी आकांक्षा चतुर्वेदी हिने आत्महत्या केली. ‘सॉरी आई-बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’ अशी भावनिक चिठ्ठी तिने मागे ठेवली असून या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ
'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ
Published on

डॉक्टर होऊन कुटुंबाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या आकांक्षा चतुर्वेदी हिने आत्महत्या केली असून तिच्या मृत्यूनंतर सापडलेल्या चिठ्ठीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मगनिया गावची रहिवासी असलेली आकांक्षा नागपूरमधील एका कोचिंग संस्थेत NEET परीक्षेची तयारी करत होती. २० मे रोजी ती तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

‘मम्मी-पापा, पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नाही’

आत्महत्येनंतर कुटुंबीयांना तिची हस्तलिखित चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत आकांक्षाने आपल्या मनातील वेदना व्यक्त करत आई-वडिलांची माफी मागितली आहे.

चिठ्ठीत तिने लिहिले, “आई-बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास होता की मी खूप अभ्यास करून डॉक्टर बनेन. पण आता माझ्यात पुन्हा NEET परीक्षा देण्याची हिंमत उरलेली नाही. पहिल्या प्रयत्नात मला चांगले गुण मिळत होते, पण पुन्हा तसंच होईल याची काय खात्री... आई-बाबा, मला माफ करा. मी सगळं काही उद्ध्वस्त केलं.”

आकांक्षाची हस्तलिखित चिठ्ठी
आकांक्षाची हस्तलिखित चिठ्ठी

परीक्षेनंतर होती आत्मविश्वासात

आकांक्षाचे काका जगदीश प्रसाद चतुर्वेदी यांनी सांगितले की, परीक्षा दिल्यानंतर आकांक्षा खूप आनंदी होती. तिला ६५० पेक्षा जास्त गुण मिळतील, असा विश्वास होता.

“ती परीक्षेनंतर खूप खूश होती. मात्र परीक्षेबाबत कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या बातम्या समोर आल्यानंतर ती धक्क्यात गेली. तिने जेवण कमी केले, बोलणे कमी केले आणि सतत अस्वस्थ राहू लागली. गोष्टी इतक्या टोकाला जातील याची आम्हाला कल्पनाही नव्हती,” असे त्यांनी सांगितले.

मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांची धडपड

आकांक्षाचे वडील कृष्णकुमार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी आणि कोचिंगचा खर्च भागवण्यासाठी ते नागपुरात स्वयंपाकाचे कामही करत होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आकांक्षाच्या शिक्षणासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेतून सुमारे ३ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. याशिवाय नातेवाईकांकडूनही आर्थिक मदत घेण्यात आली होती.

विद्यार्थ्यांवरील तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर परीक्षा आणि त्यासंबंधित वादांचा किती खोल परिणाम होऊ शकतो, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आकांक्षाच्या गावातील तिची खोली आजही तिची पुस्तके, नोट्स आणि डॉक्टर होण्याची स्वप्ने जपून आहे. मात्र त्या स्वप्नांसोबत आता कुटुंबाच्या हाती उरली आहे ती केवळ एक माफी मागणारी चिठ्ठी.

logo
marathi.freepressjournal.in