NEET Paper Leak : ‘आरोपी बाहेर आल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती’; खैरनारला ६ जूनपर्यंत कोठडी

‘नीट’ परीक्षा पेपर लीक प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याला दिल्ली न्यायालयाने रविवारी ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
NEET Paper Leak : ‘आरोपी बाहेर आल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती’; खैरनारला ६ जूनपर्यंत कोठडी
NEET Paper Leak : ‘आरोपी बाहेर आल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती’; खैरनारला ६ जूनपर्यंत कोठडी
Published on

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षा पेपर लीक प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याला दिल्ली न्यायालयाने रविवारी ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश रुची अग्रवाल असराणी यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाची    आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची याचिका मंजूर केली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, खैरनारसह इतर आरोपी 'नीट-यूजी २०२६' परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच लीक करण्याच्या कटात सक्रियपणे सहभागी होते.

आरोपींनी फरार होणे, भौतिक किंवा डिजिटल पुरावे नष्ट करणे आणि ‘प्रश्नपत्रिका लीक करण्यासारखे आणखी गुन्हे करणे’ हे प्रकार रोखण्यासाठी न्यायालयीन कोठडीची अत्यंत गरज असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने पुढे म्हटले की, ‘सध्या हे प्रकरण तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून न्यायालयीन कोठडी देणे प्रकरणाच्या हिताचे आहे. तसेच, तपासातील पुढील घडामोडींनुसार कायदेशीर तरतुदींच्या आधारे खैरनारची पुन्हा पोलीस कोठडी आवश्यक भासू शकते."

यापूर्वी १४ मे रोजी न्यायालयाने खैरनार आणि इतर चार जणांना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. पैशांच्या हव्यासापोटी गोपनीय परीक्षांचे पेपर लीक करणाऱ्या आणि ते पसरवणाऱ्या एका ‘संघटित टोळीचा’ हा कारनामा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर २० मे रोजी खैरनारच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली होती. ज्या इतर सह-आरोपींना खैरनारने नीटचे पेपर विकले होते, त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी त्याची अधिक चौकशी करणे आवश्यक असल्याचे सीबीआयने सांगितले होते.

याशिवाय, या 'पेपर लीक नेटवर्क'शी संबंधित डिजिटल उपकरणे जप्त करणे आणि संपर्काचे रेकॉर्ड्स तसेच आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे आवश्यक असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले. या मोठ्या कटाचा मुख्य सूत्रधार आणि लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेचा मूळ स्त्रोत शोधण्यासाठी आरोपीला महाराष्ट्रातील नाशिकसह देशाच्या विविध भागांत नेण्याची गरजही सीबीआयने व्यक्त केली होती.

NEET Paper Leak : ‘आरोपी बाहेर आल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती’; खैरनारला ६ जूनपर्यंत कोठडी
NEET Paper Leak: 'आरसीसी'च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या; ९ दिवसांची सीबीआय कोठडी

दरम्यान, न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अटक करण्यात आलेली पुण्याची भौतिकशास्त्राची प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार सध्या ट्रान्झिट रिमांडवर असून, तिला सोमवारी संबंधित न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, सीबीआय कोठडी संपल्यानंतर इतर पाच आरोपींना २५ मे रोजी न्यायालयासमोर हजर केले जाईल.

मोटेगावकरचे ‘पाणी’

लातूर: देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी घोटाळ्यात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असतानाच, आता या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकर याचा एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रा. मोटेगावकर वर्गातील बेंचवर उभा असल्याचे दिसत आहेत. त्याच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने आहेत. या आंब्याच्या पानांच्या सहाय्याने तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर तो मोठ्या आवेशाने शिंपडत आहे. एवढ्यावरच न थांबता, पाणी शिंपडत असताना, विद्यार्थ्यांना उद्देशून मोठ्याने ओरडून सांगत आहे की, ‘तुम्ही सर्वजण थेट 'एम्स'ला लागणार आहात आणि हा योग अनेक वर्षांनंतर आला आहे. (एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. हे आयआयटीच्या दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालय मानले जाते.)

logo
marathi.freepressjournal.in