

NEET-UG २०२६ च्या फेरपरीक्षेआधी विद्यार्थ्यांची फसवणूक आणि पेपरफुटीच्या अफवा रोखण्यासाठी NTA आणि केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवरील प्रवेश २२ जूनपर्यंत बंदी घातली आहे. तसेच ३० जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे.
टेलिग्रामवर निर्बंध का?
NTA च्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत टेलिग्रामवरील अनेक चॅनेल्स आणि ग्रुप्समध्ये ‘NEET पेपर मिळवून देण्याचे’ खोटे दावे केले जात होते. ‘PAPER LEAKED NEET’, ‘Re-NEET 2026’, ‘Private Mafia’ अशा नावांनी चालणाऱ्या चॅनेल्सवर विद्यार्थ्यांना आणि पालकांना पैसे उकळण्याचे प्रकार समोर आले होते.NTA ने स्पष्ट केले की, परीक्षा होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्ती किंवा प्लॅटफॉर्मकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध नसते. अशा सर्व दाव्यांवर विश्वास ठेवू नये.
पोलिस आणि सायबर यंत्रणांची कारवाई
गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने विविध राज्यांच्या पोलिसांसोबत मिळून अनेक टेलिग्राम चॅनेल्स आणि बॉट्सवर कारवाई केली आहे. बिहार, गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.
मेसेज एडिट सुविधा का बंद?
काही लोक जुने मेसेज एडिट करून त्यात पेपर किंवा उत्तरतालिका टाकून खोटा आभास निर्माण करत होते. हे रोखण्यासाठी ३० जूनपर्यंत मेसेज एडिट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
NTA चे विद्यार्थ्यांना आवाहन
NTA ने विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा पेपर मिळवून देण्याच्या दाव्यांपासून दूर राहावे. फसवणूक आढळल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर तक्रार करावी.विद्यार्थ्यांनी आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, परीक्षेची सुरक्षा पूर्णपणे अबाधित असल्याचे NTA ने सांगितले आहे.