NEET UG Re-Exam 2026 : 'नीट' पुनर्परीक्षेची तारीख जाहीर; नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर

परीक्षा प्रक्रियेत यावेळी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. याआधी परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ अधिकृतपणे दिला जात नव्हता. संपूर्ण परीक्षा ३ तासांची (१८० मिनिटे) असायची आणि त्याच वेळेत प्रश्न सोडवणे व OMR शीट भरणे अपेक्षित होते. मात्र, आता...
NEET UG Re-Exam 2026 : 'नीट' पुनर्परीक्षेची तारीख जाहीर; नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर
NEET UG Re-Exam 2026 : 'नीट' पुनर्परीक्षेची तारीख जाहीर; नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर(संग्रहित छायाचित्र)
Published on

वैद्यकीय प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट (NEET UG २०२६) पुनर्परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. पेपरफुटीच्या आरोपांनंतर ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता नव्या वेळापत्रकानुसार भारतासह परदेशातील परीक्षा केंद्रांवर पुनर्परीक्षा पार पडणार आहे. यावेळी काही नियमांमध्येही बदल जाहीर करण्यात आले आहेत.

ॲडमिट कार्ड्स १४ जूनपर्यंत

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुनर्परीक्षेसाठी आवश्यक असणारे ॲडमिट कार्ड्स १४ जूनपर्यंत जारी केले जातील, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी जवळपास एक आठवड्याचा अतिरिक्त कालावधी तयारीसाठी मिळणार आहे. पुनर्परीक्षेसाठीचे सुधारित ॲडमिट कार्ड्स अधिकृत नीट (NEET) संकेतस्थळावर उपलब्ध असेल. विद्यार्थी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील.

परीक्षा केंद्राचे शहर पुन्हा निवडण्याची संधी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पसंतीचे परीक्षा केंद्र पुन्हा निवडण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा कालावधी दिला जाणार आहे. मागील परीक्षेदरम्यान प्रवासाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

OMR शीटसाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ

परीक्षा प्रक्रियेत यावेळी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. याआधी NEET UG परीक्षेसाठी वेगळा अतिरिक्त वेळ अधिकृतपणे दिला जात नव्हता. संपूर्ण परीक्षा ३ तासांची (१८० मिनिटे) असायची आणि त्याच वेळेत प्रश्न सोडवणे व OMR शीट भरणे अपेक्षित होते.

आता पुनर्परीक्षेत OMR शीट भरण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांना एकूण ३ तास १५ मिनिटांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही

NTAने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत पुनर्परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी भरलेले अर्ज, विद्यार्थ्यांची माहिती आणि परीक्षा शहराची निवड आगामी परीक्षेसाठी वैध राहणार आहे. त्यामुळे आधीच नोंदणी केलेले विद्यार्थी थेट पुनर्परीक्षेला बसू शकतील.

सीबीआयकडे चौकशी

३ मे रोजी झालेल्या NEET UG २०२६ परीक्षेनंतर देशभरात पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. परीक्षा प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्यानंतर NTA आणि केंद्र सरकारने परीक्षा १२ मे रोजी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पुनर्परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे NTAने स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली आहे. कथित पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना बुधवारी दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. विविध राज्यांमधून या आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकृत अपडेट्सच फॉलो करण्याचे आवाहन

सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर NTAने विद्यार्थी आणि पालकांना केवळ अधिकृत माध्यमांवरील माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेल्पलाइन क्रमांक जाहीर

परीक्षेसंदर्भात अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास विद्यार्थी NTAच्या अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात.

ईमेल : neet-ug@nta.ac.in
हेल्पलाइन क्रमांक : ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७००

logo
marathi.freepressjournal.in