भगवान हनुमानाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. राजामौली यांच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप विष्णू गुप्ता यांनी केला.
नेमकं प्रकरण काय?
‘बाहुबली’ आणि ‘RRR’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राजामौली हे भव्य सेट, दमदार कथा आणि धमाकेदार सीनसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र एका विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. १७ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये राजामौलींच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच होता. या कार्यक्रमादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानंतर राजामौली यांनी एक वक्तव्य केलं जे चर्चेत आलंय.
राजामौली म्हणाले होते की, “मी देवावर फारसा विश्वास ठेवत नाही. माझे वडील म्हणायचे, 'हनुमान सर्व सांभाळून घेतील', पण गडबड झाल्यावर मला हनुमानाचा राग आला. माझी पत्नी हनुमानाची मोठी भक्त आहे. बिघाड झाल्यावर मी तिला विचारलं, हनुमान असे का वागतात?" राजामौली यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी त्यांच्यावर धार्मिक अपमानाचा आरोप केला.
सोशल मीडियावर टीका
या घटनेमुळे नेटकऱ्यांनी राजामौलींवर जोरदार टीका केली. काहींनी म्हटले, "तुम्ही नास्तिक असाल, पण अपयशाचे कारण हनुमानाला देणे लाजिरवाणे आहे." रामायणावर आधारित चित्रपट बनवता, पण हनुमानाबद्दल असे बोलणे चुकीचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
अधिकृत तक्रार दाखल
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजामौलींच्या वक्तव्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशा विधानांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, म्हणून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून कठोर नियम लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.