

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पाटण्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.
महिलांचा अपमान करणारे वर्तन
या घटनेवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अबू आझमी म्हणाले, “अनेक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि ज्येष्ठ नेते असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे अत्यंत दुर्दैवी आणि महिलांचा अपमान करणारे आहे.”
मुस्लिम महिलांच्या सन्मानाला धक्का
ते पुढे म्हणाले, “महिला बुरखा किंवा हिजाब घालतात, ही त्यांची वैयक्तिक निवड आहे. जबरदस्तीने तो काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मुस्लिम महिलांच्या सन्मानाला धक्का देण्यासारखे आहे. यामुळे असा संदेश जातो की मुस्लिमांच्या जीवनाला काहीच किंमत नाही.”
जोपर्यंत मुख्यमंत्री माफी मागत नाहीत, तोपर्यंत...
अबू आझमी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित महिला डॉक्टरची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. “जोपर्यंत मुख्यमंत्री माफी मागत नाहीत आणि ती महिला त्यांना माफ करत नाही, तोपर्यंत जनतेने त्यांचा निषेध करावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
महिलेचा सार्वजनिक छळ
या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, " हे पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि एका महिलेचा बुरखा जबरदस्तीने ओढणे हे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून महिलेचा सार्वजनिक छळ करण्यापेक्षा दुसरे काहीही नाही."
ते वयस्कर आहेत, पण...
"बिहार निवडणुकीपूर्वीही बऱ्याच काळापासून नितीश यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. ते वयस्कर आहेत आणि सर्वजण त्यांचा आदर करतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या पदावर आहेत त्याला स्वतःची प्रतिष्ठा आहे. एखाद्या महिलेसोबत अशा पद्धतीने वागणे त्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध जाते आणि ते खूप धोकादायक आहे. याचा परिणाम अत्यंत हानिकारक देखील असू शकतो." असे मत समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांनी मांडले.
तुमची तब्येत ठीक नसेल तर...
पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या, "तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही महिलेचा हिजाब उतरवू शकता असे नाही. सत्ता तुम्हाला मुस्लिमांना अपमानित करण्याचा अधिकार देत नाही. जर तुमची तब्येत ठीक नसेल तर कृपया पद सोडा."
नेमकं काय घडलं?
सोमवारी (१५ डिसेंबर) व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार नियुक्तीपत्र देताना एका महिला डॉक्टरचा हिजाब खाली ओढताना दिसत आहेत. ही घटना डॉक्टरांच्या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमादरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे.
या कार्यक्रमात १,२८३ आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देण्यात येत होती. संबंधित महिला डॉक्टरचे नाव नुसरत परवीन आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिला डॉक्टरला नियुक्तीपत्र देतात. त्यानंतर तिच्या डोक्यावर असलेल्या हिजाबबाबत ते प्रश्न विचारतात. त्यानंतर ते स्वतःच हाताने तो हिजाब खाली ओढतात. या प्रकारामुळे नुसरत परवीन त्या क्षणी स्पष्टपणे गोंधळलेल्या आणि अस्वस्थ असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते.
या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून, महिलांचा सन्मान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक आस्थेचा आदर या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.