खेळता-खेळता चिमुकल्यावर कोसळलं लोखंडी गेट; ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

नोएडामध्ये खेळताना लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खेळता-खेळता चिमुकल्यावर कोसळलं लोखंडी गेट; ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
Published on

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असताना लोखंडी गेट अचानक अंगावर कोसळल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना नोएडातील फेज-२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेझा गावात घडली असून मृत मुलाचं नाव नवदीप असल्याचं सांगितलं जात आहे.

खेळताना घडला भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ९:२० वाजण्याच्या सुमारास नवदीप घराबाहेर खेळत होता. खेळताना तो शेजारी उभारण्यात आलेल्या मोठ्या लोखंडी गेटवर लटकू लागला. काही क्षणांतच अचानक गेटचा तोल गेला आणि जड गेट थेट त्याच्या अंगावर कोसळलं.

गेटखाली दबल्या गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. स्थानिकांच्या मदतीने गेट बाजूला करून मुलाला बाहेर काढण्यात आलं.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

कुटुंबीयांनी नवदीपला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हायरल सीसीटीव्ही व्हिडीओ

गेटच्या स्थितीबाबत आधीही चिंता

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित लोखंडी गेट बरंच जुनं आणि कमकुवत झालं होतं. त्याच्या अवस्थेबाबत यापूर्वीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, वेळेत दुरुस्ती न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फेज-२ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in