

ओडिशातील भुवनेश्वर येथे घडलेल्या एका थरारक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भुवनेश्वरमधील पलासुनी ब्रिजवर भरधाव हायवा ट्रकने एका कारला धडक दिल्यानंतर अनेक मीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. या कारमध्ये वडील आणि मुलगी प्रवास करत होते.
शुक्रवारी (दि. २९) उशिरा रात्री घडलेल्या या घटनेत ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन थांबवण्याऐवजी ट्रक चालकाने कारला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे पुलावरील इतर वाहनचालकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
व्हायरल व्हिडिओ पाहा
मोबाईलमध्ये कैद झाला थरार
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही वाहनचालकांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत बेफाम अवजड वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कारमधील वडील आणि मुलगी या दोघेही या भीषण अपघातातून ते बचावले असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. ट्रक चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.