Ola कर्मचाऱ्याची आत्महत्या; CEO भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल, २८ पानी सुसाइड नोट, कंपनीची न्यायालयात धाव

ओलाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ओला इलेक्ट्रिकमध्ये कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर ही कारवाई करण्यात आली.
Ola कर्मचाऱ्याची आत्महत्या; CEO भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल, २८ पानी सुसाइड नोट, कंपनीची न्यायालयात धाव
Published on

ओलाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ओला इलेक्ट्रिकमध्ये कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर ही कारवाई करण्यात आली. बंगळुरू पोलिसांनी अग्रवाल यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्याच्या आत्महत्यानंतर दोन दिवसांनी अचानक त्याच्या खात्यावर कंपनीकडून १७ लाख रुपये जमा झाले. यामुळे कुटुंबीयांचा संशय वाढला आणि त्यांनी ओला कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.

विष प्राशन करून कर्मचाऱ्याची आत्महत्या

मृत कर्मचाऱ्याचे नाव के. अरविंद (वय ३८) असून तो बंगळुरूमधील चिक्कलसांद्रा येथे राहत होता. २०२२ पासून तो ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलोगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. २८ सप्टेंबर रोजी अरविंदने आपल्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुसाइड नोटमधील गंभीर आरोप

कुटुंबीयांना अरविंदच्या घरातून २८ पानी सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये अरविंदने ओला इलेक्ट्रिकमधील वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास आणि CEO भाविश अग्रवाल यांचा थेट उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की, “सततचा दबाव, अपमान, आणि अन्यायकारक वागणूक यामुळे मी मानसिकदृष्ट्या कोसळलो आहे. मी कामावरून हटवला जाईल, या भीतीने जगणं कठीण झालं.” ज्यामध्ये त्याने आपल्या वरिष्ठांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाचा आणि दबावाचा उल्लेख केला आहे. त्याच नोटमुळे या प्रकरणाने नवं वळण घेतलं.

कुटुंबीयांकडून गुन्हा दाखल

६ ऑक्टोबर रोजी अरविंदचा मोठा भाऊ अश्विन कन्ननने पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. त्याच्या म्हणण्यानुसार, “अरविंदवर कामाच्या ठिकाणी मानसिक ताण आणि छळ केला जात होता. वरिष्ठांनी त्याच्यावर सतत दबाव आणला, त्याला वेतन व प्रोत्साहन भत्ते वेळेवर दिले गेले नाहीत. त्यामुळे तो नैराश्यात गेला आणि शेवटी त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.” तक्रारीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बँक खात्यात अचानक जमा झाले १७ लाख

एफआयआरमधील तपशीलानुसार, अरविंदच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी म्हणजे ३० सप्टेंबर रोजी त्याच्या बँक खात्यात १७ लाख ४६ हजार रुपये एनईएफटीद्वारे जमा झाले. या रकमेमुळे कुटुंबाचा संशय आणखी वाढला. अश्विन कन्नन यांनी सांगितले की, “हे पैसे का आणि कोणत्या कारणासाठी जमा झाले हे समजले नाही. आम्ही चौकशी केली असता कंपनीच्या प्रतिनिधींनी काही अस्पष्ट उत्तरं दिली. त्यामुळे कंपनी काहीतरी लपवत आहे, असा आमचा विश्वास आहे.”

कंपनीने फेटाळले आरोप

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे, आमचे सहकारी अरविंद यांच्या दुर्दैवी निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि या कठीण काळात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. अरविंद साडेतीन वर्षांहून अधिक काळ ओला इलेक्ट्रिकशी जोडलेले होते आणि ते बंगळुरू येथील आमच्या मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात, अरविंद यांनी त्यांच्या नोकरीबद्दल किंवा कोणत्याही छळाबद्दल कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या भूमिकेत प्रवर्तकासह कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाशी थेट संवाद साधण्याचाही समावेश नव्हता. आम्ही माननीय कर्नाटक उच्च न्यायालयात एफआयआर नोंदविण्यास आव्हान दिले आहे आणि ओला इलेक्ट्रिक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बाजूने संरक्षणात्मक आदेश देण्यात आले आहेत.

यासाठी दिले पैसे

प्रवक्त्यांनी सांगितले, कुटुंबाला तात्काळ मदत करण्यासाठी, कंपनीने त्यांच्या बँक खात्यात पूर्ण आणि अंतिम रक्कम जमा करण्याची सुविधा दिली. ओला इलेक्ट्रिक तपासात पूर्ण सहकार्य करत आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, आदरयुक्त आणि सहाय्यक कार्यस्थळ राखण्यासाठी वचनबद्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in