
लोकसभेत आज (दि.२९) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'वर भाषण करत २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "भारताने फक्त २२ मिनिटांत त्या हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं. तसेच त्यांना पोसणाऱ्या आकांची झोप उडाली आहे."
पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, "मी विजयाच्या भावनेने येथे उभा आहे आणि ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी येथे आरसा दाखवण्यासाठी आलो आहे.''
पहलगाम हल्ल्यानंतर निर्णायक प्रतिउत्तर -
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहलगाम हल्ल्यानंतर मी तात्काळ परदेशातून परत आलो. त्याच दिवशी बैठक बोलावली आणि सैन्याला पूर्ण मोकळीक दिली. सैन्याने अवघ्या २२ मिनिटांत हल्ला करून दहशतवाद्यांना गाढलं. त्यांना पोसणाऱ्या आकांची झोप उडाली आहे. ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला, ते आका आज थरथरत आहेत.”
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर थेट कारवाई करत भारताने 'सिंधूपासून सिंदूरपर्यंत' आपली ताकद दाखवून दिली, असं पंतप्रधान म्हणाले. या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई तळांवर मोठं नुकसान झालं असून, त्यांचे एअरबेस अजूनही आयसीयूमध्ये आहेत, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
१००० क्षेपणास्त्रं आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केले -
पंतप्रधानांनी खुलासा केला की, ९ मे रोजी पाकिस्तानने १००० क्षेपणास्त्रं आणि ड्रोन्स भारतावर सोडले, पण भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने ती सर्व हवेतच नष्ट केली. हा क्षण देशासाठी अभिमानाचा होता, असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसनं मात्र भारताचं समर्थन केलं नाही -
मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर जगातील १९० देशांपैकी फक्त तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. पण, दुर्दैव असं की, माझ्या देशातील काँग्रेसनं मात्र भारताचं समर्थन केलं नाही. काँग्रेस पाकिस्तानच्या अपप्रचाराचे प्रवक्ते झाले आहेत.”
“पहलगामच्या घटनेनंतर काँग्रेसने विचारलं, मोदींची ५६ इंची छाती कुठे गेली? पण आम्ही बोलण्याऐवजी प्रत्यक्ष कृती केली. काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि आता ऑपरेशन सिंदूर या सर्वांवर संशय घेतला. त्यांनी कायमच भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवला,” असं मोदी म्हणाले.
ट्रम्प यांची मध्यस्थी फेटाळली -
पंतप्रधानांनी सांगितलं की, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ९ मे रोजी सातत्याने संपर्क साधत होते. त्यांनी सूचित केलं की पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो. यावर मोदी म्हणाले, “मी त्यांना स्पष्ट सांगितलं, पाकिस्तान काही करणार असेल, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. भारत गोळीला गोळीने उत्तर देईल.”
२ ते १० मे दरम्यान भारताने पाकिस्तानातील अनेक तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय सैन्य प्रमुखांना फोन करून कारवाई थांबवण्याची विनंती केली गेली, अशी माहितीही मोदींनी देत ट्रम्प यांची मध्यस्थी फेटाळली.
पाकव्याप्त काश्मीरला कॉँग्रेस जबाबदार - मोदी
मोदी म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर आज पाकिस्तानकडे आहे, यासाठी कोण जबाबदार? १९६५ मध्ये आपण घेतलेला हाजीपीर पास काँग्रेसने परत दिला. १९७१ मध्ये ९१ हजार पाकिस्तानी सैनिक आणि मोठी जमीन भारताच्या ताब्यात होती, पण संधी असूनही काँग्रेसने पाकव्याप्त काश्मीर परत घेतलं नाही.”
ऑपरेशन सिंदूर फक्त एक लष्करी मोहीम नव्हती, तर ती भारताच्या ठाम राजकीय इच्छाशक्तीचं, आत्मनिर्भरतेचं आणि जागतिक पातळीवर नेतृत्व दाखवण्याचं उदाहरण ठरली, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.