ऑपरेशन सिंदूर स्वदेशी संरक्षण यंत्रणेचा विजय; पाकच्या नापाक कारवाईवर भारताचे सडेतोड उत्तर

भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर आता युद्धबंदीच्या निर्णयामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. तिन्ही सैन्यदलांच्या ऑपरेशन्स प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय लष्करप्रमुख एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत पुन्हा असे हल्ले झाल्यास हल्ल्यानुसार युद्धाची पद्धत बदलेल असा पाकिस्तानला थेट इशारा दिला.
ऑपरेशन सिंदूर स्वदेशी संरक्षण यंत्रणेचा विजय; पाकच्या नापाक कारवाईवर भारताचे सडेतोड उत्तर
Published on

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर आता युद्धबंदीच्या निर्णयामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. या पार्श्वभूमीवर डीजीएमओ स्तरावर चर्चा झाली असून तिन्ही सैन्यदलांच्या ऑपरेशन्स प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय लष्करप्रमुख एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत पुन्हा असे हल्ले झाल्यास हल्ल्यानुसार युद्धाची पद्धत बदलेल असा पाकिस्तानला थेट इशारा दिला.

लढाई पाकिस्तान विरोधात नव्हती, तर दहशतवादाविरोधात होती

पत्रकार परिषदेत बोलताना एअर मार्शल भारती म्हणाले, "ही लढाई पाकिस्तानविरोधात नव्हती, तर दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होती. मात्र, पाकिस्तानने ही लढाई स्वतःची बनवली आणि दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही कठोर प्रत्युत्तर दिले आणि यात जे काही नुकसान झाले, त्यासाठी पाकिस्तान स्वतः जबाबदार आहे.

हवाई हल्ल्यांना तोंड देताना भारताची सक्षम तयारी

डीजीएमओ वाइस एडमिरल एएन प्रमोद यांनी सांगितले की, भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी 'मल्टी-लेयर संरचना' तयार केली होती. लढाऊ विमाने, गुप्तचर यंत्रणा आणि अत्याधुनिक रडार प्रणालींनी दिवस-रात्र हवाई जागेवर सतर्क नजर ठेवली. त्यामुळे कोणत्याही शत्रू विमानाला भारताच्या हद्दीत शिरकाव करता आला नाही.

पाकिस्तानच्या PL-15 क्षेपणास्त्राचा नाश, नूरखान एअरबेस उद्ध्वस्त

भारतीय लष्कराने पाकिस्तानचे चिनी बनावटीचे PL-15 क्षेपणास्त्र पाडले. यासोबतच पाकिस्तानचे ड्रोन आणि लेसर गन लक्ष्य करण्यात आले. स्वदेशी आकाश प्रणाली आणि काउंटर ड्रोन सिस्टमच्या साहाय्याने पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन निष्प्रभ करण्यात आले. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा नूरखान एअरबेसही उद्ध्वस्त करण्यात आला आहे.

तुर्की असो वा अन्य कोणत्याही देशाचे ड्रोन, भारताची स्वदेशी काउंटर यूए सिस्टीम पूर्णपणे सक्षम आहे. आमचे प्रशिक्षित हवाई संरक्षण ऑपरेटर कोणत्याही तंत्रज्ञानाचा सामना करण्यास तयार आहेत," असे स्पष्ट करत एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले की, "आज आपण सिद्ध केले आहे, की कोणतीही परकीय प्रणाली भारताच्या हद्दीत घुसू शकत नाही."

हवाई संरक्षणात स्वदेशी ताकद आणि आत्मनिर्भरता

एअर मार्शल भारती यांनी पुढे म्हंटले, की "आपली हवाई संरक्षण प्रणाली बहुस्तरीय असून कोणालाही तिच्यात प्रवेश करता येणार नाही. आपल्या देशात स्वदेशी काउंटर-यूए (Unmanned Aircraft) सिस्टम आहे, आणि आपले प्रशिक्षित ऑपरेटर कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला तोंड देण्यास सक्षम आहेत. यामुळेच भारतीय हवाई संरक्षण प्रणाली ही देशासाठी भिंतीसारखी ठामपणे उभी होती. शत्रूंना या संरचनेला भेदणे पूर्णपणे अशक्य होते.

पहलगाम घटनेने त्यांच्या पापाचा घडा भरला

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, "ऑपरेशन सिंदूरच्या हवाई संरक्षण कारवाईला आपण एका संदर्भात समजून घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत होते, आता आपल्या सैन्यासोबतच निष्पाप लोकांवरही हल्ले होत आहेत. २०२४ मध्ये शिवखोडी मंदिरात जाणारे यात्रेकरू आणि या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटक. पहलगाम घटनेने त्यांच्या पापाचा घडा भरला होता. कारण दहशतवाद्यांवर आमचे अचूक हल्ले नियंत्रण रेषा (LOC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केले जात होते. त्यामुळे आम्हाला पूर्ण कल्पना होती, की पाकिस्तानचा हल्ला सीमेपलीकडूनही होईल. म्हणून आम्ही हवाई संरक्षणाची तयारी केली होती. जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने ९-१० मे रोजी आमच्या हवाई क्षेत्रावर आणि लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ला केला तेव्हा ते या मजबूत हवाई संरक्षण ग्रिडसमोर टिकू शकले नाहीत.''

"हे युद्ध वेगळ्या प्रकारचं होतं, पुढचं युद्ध आणखी वेगळं असेल"

एअर मार्शल भारती यांनी स्पष्ट केले की, "हे युद्ध वेगळ्या स्वरूपाचं होतं आणि भविष्यात जर युद्ध झालं, तर ते यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं लढलं जाईल. प्रत्येक युद्धाचं स्वरूप हल्ल्यानुसार बदलत असतं."

पत्रकार परिषदेत भारती यांनी,

विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति।

बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति।।

हि रामचरितमानस मधील प्रसिद्ध ओवी उद्धृत करत पाकिस्तानला ''समझने वाले को इशारा काफी'' म्हणत टोला लगावला. भारताला शांतता हवी आहे, पण जर कोणी अशांतीचा मार्ग निवडला, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पाकिस्तानच्या नापाक कारवाया नष्ट

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "तुम्ही पाकिस्तानी एअरफील्डची दुर्दशा पाहिली आणि आज एअर मार्शलचे सादरीकरण पाहिले. आमची एअरफील्ड सर्व प्रकारे कार्यरत आहेत. आमच्या ग्रिडमुळे पाकिस्तानचे ड्रोन नष्ट झाले. मी आमच्या सीमा सुरक्षा दलाचे कौतुक करतो... ज्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया नष्ट झाल्या.''

शेवटी एअर मार्शल ए.के. भारती यांनी म्हंट्लं, की आमचं काम हे दहशतवादी तळांवर अचूक प्रहार करणं आहे; त्यांचे प्रेत मोजणे नाही. यावरून त्यांनी स्पष्ट केलं, की भारताचं लक्ष्य हे फक्त दहशतवादी आणि त्यांच्या आधारभूत संरचना नष्ट करणं होतं, आणि ते उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूर मार्फत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in