

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडवली होती. या भयंकर घटनेत २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्याच्या तब्बल तीन महिन्यांनंतर भारतीय सुरक्षा दलांनी २८ जुलै रोजी ‘ऑपरेशन महादेव’ राबवत या हल्ल्यामागील तीन प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर समोर आलेले पुरावे आणि तपासाच्या निष्कर्षांवरून हे स्पष्ट झाले आहे की, हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट हात होता.
सुरक्षा यंत्रणांने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे सुलेमान शाह, अबू हमजा उर्फ अफगानी आणि यासिर उर्फ जिब्रान अशी आहेत. यापैकी सुलेमान हा पहलगाम हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता, तर हमजा आणि यासिर हे गोळीबारात सहभागी होते. हे तिघेही पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑपरेशन महादेव नंतर दहशतवाद्यांकडून मिळालेल्या वस्तूंमधून या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचे सिद्ध झाले आहे. या वस्तूंमध्ये पाकिस्तान निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदार ओळखपत्राच्या स्लिप्स, कराचीत उत्पादित चॉकलेटचे रिकामे रॅपर्स आणि एक खराब झालेला सॅटेलाईट फोन होता. या फोनमधून मिळालेल्या मायक्रो SD कार्डमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचे NADRA (पाकिस्तान नॅशनल डेटाबेस) बायोमेट्रिक रेकॉर्ड सापडले. यामध्ये त्यांच्या बोटांचे ठसे, चेहऱ्याचे स्कॅन टेम्प्लेट्स आणि कौटुंबिक माहितीचा समावेश होता. यातील सुलेमान आणि हमजा यांचे नोंदणीकृत पत्ते पाकव्याप्त काश्मीरमधील कोइयान गाव आणि पंजाब प्रांतातील (पाकिस्तानमधील) कसूर जिल्ह्यातील चांगा मांगा येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासादरम्यान मिळालेला आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे सुलेमानच्या गार्मिन घड्याळातून सापडलेले GPS कोऑर्डिनेट्स. हे लोकेशन पहलगाम हल्ल्याच्या फायरिंग पॉईंटशी अचूक जुळत होते. याशिवाय, पहलगाम हल्ल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या ७.६२x३९ मिमी रायफल काडतुसांच्या कव्हर्सचे बॅलेस्टिक विश्लेषण करण्यात आले. हे कव्हर्स 'ऑपरेशन महादेव'मध्ये जप्त करण्यात आलेल्या एके-४७ रायफल्सवरील स्ट्रायशन मार्क्सशी पूर्णपणे जुळले. त्यामुळे या तिन्ही दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले.
तसेच, पहलगाममध्ये एका पर्यटकाच्या फाटलेल्या शर्टावर सापडलेल्या रक्ताचे मायटोकॉन्ड्रियल डीएनए नमुने, दाचिगाममध्ये चकमकीत ठार झालेल्या मृतदेहांच्या नमुन्यांशी जुळले. या तुलनेतून पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन महादेव'मधील चकमक यांचा परस्परसंबंध अधिक ठोसपणे सिद्ध झाला आहे.
गुप्तचर विभागाच्या तपासात असेही समोर आले की, हे तिघे मे २०२२ मध्ये नियंत्रण रेषेजवळील गुरेज सेक्टरमधून भारतात घुसले होते. पाकिस्तानातून त्यांचा पहिला रेडिओ सिग्नल ट्रॅक करण्यात आला होता. त्यानंतर २१ एप्रिल रोजी ते बैसरनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिल पार्क परिसरातील हंगामी झोपड्यांमध्ये गेले होते. त्यांना परवेझ आणि बशीर अहमद या दोन स्थानिक काश्मीरी नागरिकांनी अन्न आणि आश्रय पुरवला होता. या दोघांनी NIAसमोर कबुली दिली असून, त्यांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे.
२२ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास या दहशतवाद्यांनी बैसरनमध्ये पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर ते दाचिगामच्या घनदाट जंगलात पळून गेले. तिथेच २८ जुलै रोजी सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या कारवाईत त्यांचा खात्मा झाला.
जप्त केलेले दस्तऐवज, बायोमेट्रिक डेटा आणि शस्त्रास्त्रांच्या बॅलेस्टिक चाचणीतून हे स्पष्ट झाले आहे की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधूनच आले होते.