

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईने पाकिस्तानला जबर धक्का दिल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एवढेच नाही, तर पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडण्यात आली. त्यांचे हवाई तळ, रडार आणि क्षेपणास्त्र यंत्रणा मोठ्या प्रमाणावर नष्ट केल्याची माहिती भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी शुक्रवारी (दि. ३) दिली.
लढाऊ विमाने आणि तळ उद्ध्वस्त
९३ व्या हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एअर चीफ मार्शल सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने अमेरिकन बनावटीचे F-16, चिनी बनावटीचे JF-17 यांसह पाकिस्तानची ४ ते ५ लढाऊ विमाने पाडली. याशिवाय एक C-130 श्रेणीचे विमानही उद्ध्वस्त करण्यात आले.
त्यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानमधील ४ रडार केंद्रे, २ कमांड अँड कंट्रोल सेंटर, २ धावपट्ट्या, तसेच ३ हँगर या कारवाईत पूर्णपणे उध्वस्त झाले. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (SAM) देखील नष्ट करण्यात आली.
३०० किलोमीटर पल्ल्याचा ऐतिहासिक हल्ला
या कारवाईदरम्यान भारताने इतिहासात प्रथमच सीमेपलीकडे ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला केला. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची हवाई क्षमता मोठ्या प्रमाणावर खिळखिळी झाली.
पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना भारताची ६ ते ७ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचे कोणतेही पुरावे पाकिस्तान देऊ शकले नाही. उलट भारतीय हवाई दलाने स्पष्ट पुराव्यासह पाकिस्तानच्या ४ ते ५ विमानांचे नुकसान झाल्याचे सांगून पाकिस्तानचे खोटे पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे.
४ दिवस चाललेली कारवाई
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईदरम्यान ९ दहशतवादी तळ नष्ट झाले. तसेच पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असताना भारताने ११ हवाई तळांवर हल्ले चढवले. ४ दिवस चाललेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून युद्धबंदीची मागणी करण्यात आली आणि १० मे रोजी संघर्ष थांबला.
जगासाठी ऑपरेशन सिंदूर एक धडा
पत्रकार परिषदेत बोलताना एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले, “हे युद्ध एका स्पष्ट उद्दिष्टाने सुरू झाले आणि ते अगदी कमी वेळात संपवले गेले. जगातील इतर ठिकाणी युद्धे सुरू आहेत, मात्र तेथे समाप्तीबद्दल चर्चा नाही. भारताने पाकिस्तानला अशा टप्प्यावर आणले की त्यांना स्वतःहून युद्धबंदी मागावी लागली. हा जगासाठी एक धडा आहे.”
भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, तिन्ही दलांनी एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’नियोजनबद्ध रितीने पार पाडले. भविष्यातील गरज लक्षात घेऊन ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली होती, त्याचाच भाग म्हणून हा प्रकल्प राबवला जाणार आहे.