
नवी दिल्ली – पाकिस्तानने अनेकदा केलेला "पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत नाही" हा दावा भारताने ठामपणे फेटाळला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या या दाव्याचे खंडन करत ठोस पुरावे सादर केले. त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित असलेल्या पाकिस्तानी लष्कर व पोलिस अधिकाऱ्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सादर केली.
अब्दुल रौफचा मृत्यू आणि त्याचे अंत्यसंस्कार
अमेरिकन ट्रेझरीने घोषित केलेला वैश्विक दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा (LeT) कमांडर अब्दुल रौफ याला पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरीदके येथे ठार करण्यात आले. एएनआयच्या वृत्तानुसार त्याचे अंत्यसंस्कार पाकिस्तानमध्ये पार पडले. विशेष बाब म्हणजे या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानी लष्कर आणि पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित असलेले पाकिस्तानी अधिकारी:
लेफ्टनंट जनरल फय्याज हुसेन – कमांडर, लाहोर IV कॉर्प्स
मेजर जनरल राव इम्रान – प्रमुख, लाहोर 11 वा पायदळ विभाग
ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान – प्रशासन अधिकारी
उस्मान अन्वर – आयजी, पंजाब पोलिस (पाकिस्तान)
मलिक सोहेब अहमद – पंजाब प्रांतातील आमदार (पाकिस्तान)
या अधिकाऱ्यांची उपस्थिती पाकिस्तानच्या 'दहशतवादाला पाठिंबा दिला जात नाही' या दाव्याला पूर्णतः खोटे ठरवते.
भारतीय सशस्त्र दलांची कारवाई
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केले. या छावण्यांमध्ये PoK मधील सावल नाला, सय्यदना बिलाल, गुलपूर, बर्नाला, अब्बास; पाकिस्तानमधील भावलपूर, मुरीदके, सरजल, मेहमूना जोया या ठिकाणांचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी ठार झाले, ज्यात काही प्रमुख दहशतवाद्यांचा समावेश होता.
ठार झालेले प्रमुख दहशतवादी:
खालिद अबू आकाशा
मुदस्सीर खादियान खास
मोहम्मद हसन खान
हाफिज मुहम्मद जमील
अब्दुल रौफ अझहर (जैश-ए-मोहम्मद, प्रमुख मसूद अझहरचा भाऊ)
या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात लष्कर-ए-तैयबा कमांडर हाफिज अब्दुल रौफ पुढे होता. तर जमात-उद-दावाचे अनेक सदस्यही सहभागी होते. ही संघटना भारतात दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असून हाफिज सईदने ती स्थापन केली होती.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेल्या निवेदनानुसार, हे सर्व पुरावे पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना उघडं पाडणारे आहेत. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचा सहभाग, दहशतवादी नेत्यांचे सन्मानाने अंत्यसंस्कार आणि संरक्षण यंत्रणांची उपस्थिती यामुळे पाकिस्तान हा दहशतवादाचा आश्रयदाता देश असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.