

लग्नाच्या रिसेप्शनचा आनंद सुरू असतानाच अचानक झालेल्या गोळीबाराने वातावरण क्षणात बदललं. बिहारची राजधानी पाटण्यातील शाहपूर गावात रिसेप्शनच्या सोहळ्यात दोन सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं समजतंय.
रिसेप्शनमध्ये २६-२७ राऊंड फायरिंग
रविवारी (दि. २२) रात्री उशिरा ही घटना घडली. दौलत राय यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात पाहुण्यांची मोठी गर्दी होती. त्याच वेळी काही हल्लेखोर तेथे आले आणि मनीष कुमार व मंजीत कुमार या दोन सख्या भावांना लक्ष्य करत गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुमारे २६-२७ राऊंड फायरिंग केली.
गोळीबाराचा आवाज होताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. या हल्ल्यात मनीष कुमार याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी मंजीत कुमारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र उपचारापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला.
जमीन वादाचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात जमीन वादाची बाब पुढे आली आहे. पीडित कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक कृष्णा राय यांच्यात शाहपूर परिसरातील जमिनीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात गेला होता आणि अलीकडेच निकाल पीडितांच्या बाजूने लागला होता. या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांचा भाऊ रजनीश कुमार यांनी सांगितले की, त्यांनी हा खटला दोनदा जिंकला होता, तरीही वाद चालू होता.
पोलिस तपास सुरू
पाटणा सिटी (पूर्व) चे पोलिस अधीक्षक परिचय कुमार यांनी सांगितले की, रिसेप्शनदरम्यान दोन्ही भावांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. घटनेमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांची ओळख पटविण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचे जबाब गोळा केले आहेत.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
या दुहेरी हत्येमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा आघात झाला आहे. दोन तरुण मुलांच्या मृत्यूने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.