

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान एका १९ वर्षीय युवकाला छर्रे लागून झालेल्या दुखापतप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी एफआयआर नोंदवला आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान सहिल लोचाब हा युवक जखमी झाला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात सुमारे ६ तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्याला घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पॅलेट गन (छर्रे) गैरवापर प्रकरणात अखेर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे न्यायाला घाबरत असल्याची टीका राहुल गांधी यांनी या कारवाईपूर्वी केली. राहुल गांधी यांनी आधी सहिल लोचाब याच्यासह मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तेथे मागणी मान्य न झाल्याने त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊन नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलीस उपआयुक्त सचिन शर्मा यांची भेट घेतली. या चर्चेतून कोणताही मार्ग न निघाल्याने राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांच्यासोबत जखमी सहिल, त्याची आई, प्रियांका गांधी आणि कँग्रेसचे काही नेते उपस्थित होते.
‘संसद चलो’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरण्यात आल्याचे गंभीर आरोप झाले होते. या पोलीस कारवाईत साहिल लोचब नावाचा १९ वर्षांचा तरुण जखमी झाला होता. त्याची दृष्टी जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, दिल्ली पोलीस आणि सरकारने मात्र आंदोलकांवर पेलेट गन वापरल्याचा इन्कार केला होता. हा दावा खोटा ठरवत राहुल गांधींनी जखमी विद्यार्थ्याला मीडियासमोर आणले. त्यांच्या शरीरातून काढलेल्या पेलेट्सचे मेडिकल रिपोर्टही त्यांनी जाहीर केले आणि आंदोलन अधिक तीव्र केले.
पेपरफुटीचा बळी
कनॉट प्लेस आणि जंतर-मंतर परिसरात २० जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान १९ वर्षीय साहिल लोचब हा गंभीर जखमी झाला होता. सुरक्षा दलांच्या कारवाईदरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यात साहिलच्या चेहऱ्यावर आणि उजव्या डोळ्याच्या भागात छर्रे घुसले होते. घटनेनंतर त्याच्यावर लेडी हार्डिंग रुग्णालयात डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याला काळा चष्मा वापरावा लागत आहे. साहिल हा दिल्ली विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’चा विद्यार्थी असून त्याने २०२४ मध्ये पोलीस भरतीची परीक्षा दिली होती; मात्र पेपरफुटीमुळे ती रद्द झाल्याने तो या आंदोलनात सहभागी झाला होता.
अखेर पोलिसांची माघार आणि पुढील तपास
विरोधी पक्षाचा वाढता दबाव आणि आक्रमक आंदोलनानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी माघार घेत साहिलच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआरची प्रत मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या कारवाईमुळे आता आंदोलनादरम्यान नेमके छर्रे कोणी झाडले आणि विद्यार्थ्यांच्या दुखापतीस कोण जबाबदार आहे? याचा सखोल तपास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माझ्या मुलाच्या चेहऱ्यात आणि डोळ्यात छर्रे कसे?
साहिलची आई ज्योती या गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवत होत्या. ‘पोलिसांनी गोळीबार किंवा छर्रे झाडले नाहीत, तर मग माझ्या मुलाच्या चेहऱ्यात आणि डोळ्यात छर्रे कसे घुसले?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता. १४ ऑगस्टपासून त्यांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठवून केवळ फेऱ्या मारायला लावल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.