पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

तक्रार अधिकृतपणे नोंदवली जात नाही तोपर्यंत आपण पोलीस ठाण्याबाहेरच थांबून न्यायाची मागणी करत राहू, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. त्यानंतर...
पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. या कारवाईत जखमी झालेल्या विद्यार्थी आंदोलक साहिल लोचव याच्यासोबत राहुल गांधी यांनी शुक्रवारी (दि. २१) दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. या प्रकरणी एफआयआर नोंदवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

साहिल लोचव याच्या शरीरात २०० हून अधिक पॅलेट घुसल्याचा आणि त्यांचा एक डोळा गमावल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रार नोंदवून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली असून, प्रियंका गांधी यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

राहुल गांधी यांनी यापूर्वी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी कथितरीत्या तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यानंतर ते मध्य दिल्लीतील डीसीपी कार्यालयात गेले. कनॉट प्लेस येथील डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी २० जुलैच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत तक्रार नोंदवण्याची मागणी केली. या कारवाईत अतिरेकी बळाचा वापर तसेच पेलेट गनचा वापर झाल्याचा आरोप आहे.

FIR नोंदवली जात नाही तोपर्यंत इथेच बसणार

माहितीनुसार, तक्रार अधिकृतपणे नोंदवली जात नाही तोपर्यंत आपण पोलीस ठाण्याबाहेरच थांबून न्यायाची मागणी करत राहू, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी साहिल लोचव यांच्यासोबत डीसीपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. 'एफआयआर नाही, न्याय नाही. म्हणून आम्ही बसलो आहोत,' अशी भूमिका काँग्रेसने मांडली.

'हा केवळ विलंब नाही, तर न्याय नाकारण्याचा प्रकार आहे. एफआयआर नोंदवला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही,' असेही काँग्रेसने म्हटले.

लोचव यांची १४ ऑगस्टला लेखी तक्रार

काँग्रेसच्या निवेदनानुसार, पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या साहिल लोचव यांनी १४ ऑगस्ट रोजी आपल्या वकिलांच्या उपस्थितीत दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार स्वीकारल्याची पावती किंवा आय/ओ क्रमांक दिला नसल्याचा पक्षाचा दावा आहे. यानंतर १७ ऑगस्ट रोजी ई-मेल आणि फोन कॉलद्वारे या तक्रारीचा पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, तरीही तपास अधिकाऱ्याचा क्रमांक म्हणजेच आय/ओ क्रमांक देण्यात आला नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

गुन्हा नोंदवण्याची मागणी

राहुल गांधी लोचव याच्यासोबत डीसीपी कार्यालयात गेले आणि गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, डीसीपींनी तपास अधिकाऱ्याचे नाव किंवा आय/ओ क्रमांक दिला नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

'हा दखलपात्र गुन्हा असल्याने एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, दिल्ली पोलीस तसे करत नाहीत,' असा आरोप काँग्रेसने केला.

अमित शहांवर राहुल गांधींचा थेट निशाणा

या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही थेट टीका केली होती. २५ जुलै रोजी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राजधानीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात पेलेट गनसह अतिरेकी बळाचा वापर केल्याबद्दल अमित शहा यांना जबाबदार धरले होते.

आंदोलनादरम्यान घातक शस्त्रांच्या वापराला केंद्रीय गृहमंत्र्यांनी परवानगी दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच हा मुद्दा संसदेसाठी मूलभूत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

हजारो विद्यार्थ्यांचा संसद मोर्चा

२० जुलै रोजी हजारो विद्यार्थ्यांनी सीजेपीने आयोजित केलेल्या संसद मोर्चात सहभाग घेतला होता. नीट परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच परीक्षा व्यवस्थेत सुधारणा कराव्यात, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत विद्यार्थ्यांवर अतिरेकी बळाचा वापर झाल्याचा आणि पेलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याच कारवाईत साहिल लोचव जखमी झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मोदींच्या घरासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; मोदींच्या राजीनाम्याची मागणी, राहुल, प्रियांका ताब्यात व सुटका

न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका

पेलेट गनच्या कारवाईत विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप, त्यानंतर दाखल करण्यात आलेली लेखी तक्रार आणि त्यावर एफआयआर नोंदवण्यात न आल्याचा काँग्रेसचा दावा या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. एफआयआर नोंदवून या प्रकरणाची चौकशी करावी आणि पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळावा, ही त्यांच्या आंदोलनामागची प्रमुख मागणी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in