"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारतासंबंधी खोटे दावे केले. मे महिन्यात झालेल्या लष्करी हल्ल्यात पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताचे ७ विमाने पाडल्याचे शाहबाज शरीफ यांनी सांगितले.
"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात
Published on

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारतासंबंधी खोटे दावे केले. मे महिन्यात झालेल्या लष्करी हल्ल्यात पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताचे ७ विमाने पाडल्याचे शाहबाज शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तानच्या अशा खोट्या दाव्यांवर भारताच्या राजदूत पेटल गहलोत यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी उत्तराचा अधिकार वापरत पाकिस्तानच्या आरोपांचा पर्दाफाश केला. तर, पेटल यांनी हास्यास्पद नाटकं करून सत्य दडपता येत नाही असे पाकिस्तानला ठामपणे सांगितले.

७ भारतीय विमाने पाडली - पाकिस्तानचा दावा

शुक्रवारी महासभेत बोलताना शाहबाज शरीफ यांनी असा दावा केला की, मे २०२५ मध्ये भारताबरोबर झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ विमाने पाडली होती. तसेच, भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची कारवाई ही बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. शरीफ यांनी भारताला पूर्वेकडून 'अनावश्यक आक्रमण करणारा देश' ठरवत पाकिस्तानने केलेली कारवाई ही 'स्वसंरक्षणाच्या अधिकाराखाली' असल्याचा दावा केला.

भारताचा पाकिस्तानवर प्रहार

भारतीय राजदूत पेटल गहलोत यांनी या भारतीय दाव्यांवर प्रत्युत्तर देत म्हटले, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या व्यासपीठावर एक हास्यास्पद नाटक सादर केलं. दहशतवादाचं गौरवगान करून आपल्या परराष्ट्र धोरणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कितीही खोटं बोललं तरी सत्य लपवता येणार नाही.”

गहलोत यांनी स्पष्ट केलं, की पाकिस्तान कितीही खोट्या कथा सांगत असला तरी जगासमोर त्याचा खरा चेहरा उघड झालेला आहे. पाकिस्तान दहशतवादाचं उदात्तीकरण करत राहतो, पण आंतरराष्ट्रीय समुदायाला या गोष्टी आता दडपता येणार नाहीत.

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो

गहलोत यांनी आठवण करून दिली, की पाकिस्तान हा अनेक दशकांपासून दहशतवादाला आश्रय देत आला आहे. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला जवळपास १० वर्ष आपल्या भूमीत सुरक्षित ठेवलं. पाकिस्तानी मंत्र्यांनी स्वतः मान्य केलं आहे की त्यांच्या भूमीत दहशतवादी छावण्या दशकांपासून कार्यरत आहेत. एप्रिल २०२५ मध्ये पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. हीच संघटना जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या हत्येस जबाबदार आहे.

तर, पाकिस्तानला विजयाचा आनंद घेऊ दे

गहलोत म्हणाल्या, भारताने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या रनवेचे सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले फोटोंना जर पाकिस्तानचे पंतप्रधान विजय मानत असतील तर त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या.

भारत शून्य सहनशीलता दाखवेल

भारतातील निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. संपूर्ण जगाला भारताने दाखवून दिले आहे की भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरत नाही. तर, या पुढेही दहशतवादाविरोधात भारत शून्य सहनशीलता दाखवेल आणि लोकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल उचलेल, असे गहलोत यांनी सडेतोडपणे उत्तर दिले.

logo
marathi.freepressjournal.in