

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला लोकसभेऐवजी राज्यसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. ‘विरोधी पक्षाला निवडणुकीत सातत्याने होणारा पराभव पचविणे जड जात आहे, ते आपल्याविरुद्ध सतत द्वेषमूलक वक्तव्ये करीत आहेत, असे असले तरी ते आपली कबर कधीही खोदू शकणार नाहीत’, असा पलटवार मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.
विरोधी पक्षांनी लोकसभेत जो गदारोळ माजविला त्यामुळे गरीब, आदिवासी महिला राष्ट्रपतींचाच नव्हे तर संविधान आणि त्या उच्चपदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री बिट्टू यांचा गद्दार उल्लेख करणे हा संपूर्ण शीख समाजाचा अवमान आहे, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेसकडे ना कोणता विचार, ना कोणती दूरदृष्टी आहे, असे ते म्हणाले. मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या अनुपस्थितीतही पंतप्रधानांचे भाषण सुरू राहिले. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला, त्यांच्याकडे इच्छाशक्ती किंवा दूरदृष्टी नाही, असे ते म्हणाले.
देश आज वेगाने विकास करत आहे, आपण थांबू नये किंवा मागे वळून पाहू नये, आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचत आहोत. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश जगात सहाव्या क्रमांकावर होता, परंतु या लोकांनी (काँग्रेसने) तो दहाव्या क्रमांकावर नेला. जग एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. आपण एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. जग आपले महत्त्व ओळखत आहे. भारताने नऊ प्रमुख देशांशी व्यापार करार केले आहेत. भारत हा अनेक देशांचा विश्वासू भागीदार आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जग आपल्या प्रतिभेचे महत्त्व ओळखत आहे. भारत आपली क्षमता दाखवत आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, देश धोरणांच्या आधारे पुढे जात आहे. आज, देश सुधारणा एक्स्प्रेसमध्ये स्वार होत आहे. भारत जगाशी स्पर्धा करण्यास तयार आहे. प्रमुख देश भारतासोबत व्यापार करण्यास उत्सुक आहेत. आम्ही युरोपियन युनियनसोबत (ईयू) सर्व करारांची जननी म्हणून स्वाक्षरी केली आहे. आज, देश चांगल्या धोरणांच्या आधारे पुढे जात आहे."
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घुसखोरांना संरक्षण देत आहेत. त्यामुळे तेथील युवक आणि त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. काँग्रेस पक्ष ‘मोहब्बत की दुकान’ची भाषा करतात तेच आता ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ अशा घोषणा देऊ लागले आहेत, यावरून त्यांना निवडणुकीतील पराभवांवरून नैराश्य आल्याचे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.
लाल किल्ल्यावर काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या भाषणांचे विश्लेषण केल्यास त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दिसून येते, आज सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मंत्रांचे अनुसरण करून आपण पुढे जात आहोत. आज अनुत्पादक मालमत्ता १ टक्क्यापेक्षा कमी आहे.
कंगना यांचा आरोप
मोदी यांच्यावर हल्ला केला जाणार होता, मोदी यांना उत्तर द्यावयाचे होते, पण काँग्रेसच्या खासदारांनी त्यांचा रस्ता अडविला. बिर्ला आणि मोदी या दोघांवरही हल्ल्याचा कट होता, असा आरोप भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी केला.
मोदी अध्यक्षांच्या मागे लपले आहेत - प्रियांका
मोदी लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपले आहेत, तीन महिला उभ्या होत्या म्हणून त्यांच्यात सभागृहात येण्याची हिंमत नव्हती, सरकारला कोणतीही चर्चा होऊ द्यावयाची नाही, असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी केला.
एपस्टीन फाइल
भाजपच्या खासदारांनी केलेला आरोप काँग्रेसने सपशेल फेटाळून लावला आहे, आम्ही केवळ बॅनर घेऊन आलो होतो, भाजपकडून खोटा दावा केला जात आहे, मोदी एपस्टीन फाइलला घाबरले आहेत का, असा सवाल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना २००४ मध्ये आभार प्रस्तावावर भाषण करण्यापासून भाजपने रोखले होते. आता २०२६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या खासदारांनी मोदी यांना भाषण करण्यापासून रोखले.
पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग
तत्पूर्वी, राज्यसभेत सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या अनुपस्थितीतही पंतप्रधानांचे भाषण सुरू राहिले.
मोदींच्या भाषणाविनाच आभार प्रस्ताव संमत
तब्बल २१ वर्षांनंतर पंतप्रधानांच्या भाषणाविनाच अभिभाषणावरील आभार प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. यापूर्वी २००४ मध्ये अभिभाषणावर तत्कालीन पंतप्रधानांना भाषण करता आले नव्हते. त्यानंतर बिर्ला यांनी आभार प्रस्ताव वाचून दाखविला आणि तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला, तेव्हाही विरोधक घोषणाबाजी करीत होते.
मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न होता - भाजप
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी उत्तर देणार होते, मात्र काँग्रेसचा मोदींवर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप भाजपच्या काही खासदारांनी गुरुवारी केला. मोदी बुधवारी सायंकाळी सभागृहात चर्चेला उत्तर देणार होते, मात्र त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून विरोधकांचा गोंधळ अधिकच वाढत गेला. त्यावेळी महिला खासदार मोदी यांच्या आसनासमोर येत होत्या, असे भाजपने खासदारांनी सांगितले.
...तर अनुचित प्रकार घडला असता - बिर्ला
मोदी यांच्या आसनाभोवती काही खासदारांनी घेराव घातला होता. मोदी यांच्याबाबत काहीतरी अनुचित घडू शकले असते आणि याच कारणास्तव आपण मोदी यांना सभागृहात न येण्याची विनंती केली आणि मोदी यांनी ती मान्यही केली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केल्याने खळबळ माजली.