

ब्रिटिश काळात दिलेली नावं बदलण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. कुठे जिल्ह्यांची नावं बदलली जात आहेत तर कुठे शहरांची. अशातच, पंतप्रधानांचे कार्यालय असणाऱ्या नवीन संकुलाचे नामकरण करण्यात आले आहे. आज (दि.२) पासून पंतप्रधान कार्यालय (PMO) असलेले संकुल ‘सेवा तीर्थ’ या नावाने ओळखले जाणार आहे.
'७ रेसकोर्स रोड'वरून '७ लोककल्याण मार्ग'
‘सेवा तीर्थ’ हे संकुल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वी या इमारतीला ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’ म्हणून ओळखले जात होते. याआधी २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव '७ रेसकोर्स रोड'वरून '७ लोककल्याण मार्ग' असे करण्यात आले होते. त्यानंतर आता नवीन संकुलाचे नाव बदलण्यात आले आहे.
‘सेवा तीर्थ-१’ मधून पंतप्रधान कामकाज पाहणार
'इंडिया टीव्ही'च्या माहितीनुसार, पंतप्रधान सेवा तीर्थ-१ मधून आपले कामकाज पाहणार आहेत. या संकुलात कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, तसेच परदेशी मान्यवरांसोबतच्या बैठकींसाठी वापरले जाणारे इंडिया हाऊस यांचाही समावेश असेल.
राष्ट्रीय प्राधान्यांचे स्वरूप ठरणारे ठिकाण
अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सेवा तीर्थ हे असे कार्यस्थळ असेल, जिथे सेवा भावनेचे प्रतिबिंब दिसेल आणि राष्ट्रीय प्राधान्यांचे स्वरूप ठरेल. भारतीय सार्वजनिक संस्थांमध्ये मोठा बदल घडत आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासन संकल्पनेत बदल
अधिकाऱ्यांच्या मते, "शासनाची कल्पना आता ‘सत्ता’पासून ‘सेवा’कडे, आणि ‘अधिकार’पासून ‘कर्तव्य’कडे सरकत आहे. हे बदल केवळ नावांपुरते नाहीत, तर लोकशाहीतील मूलभूत मानसिकता बदलत असल्याचे संकेत आहेत".
पुढे ते म्हणाले, “भारतीय लोकशाही सत्ता नव्हे तर जबाबदारीला प्राधान्य देत आहे; प्रतिष्ठेपेक्षा सेवेला महत्त्व देत आहे.” नावांमध्ये होत असलेले बदल हे विचारसरणीतील संक्रमणाचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले. “आजच्या नावांमध्ये सेवा, कर्तव्य आणि नागरिक-प्रथम शासनाचे मूल्य दिसून येते,” असेही त्यांनी नमूद केले.
आठ राज्यांनी ‘राज भवन’चे नाव बदलले
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आठ राज्यांनी आणि एका केंद्रशासित प्रदेशाने ‘राज भवन/राज निवास’ ही नावे बदलून ‘लोक भवन/लोक निवास’ अशी केली आहेत. गृह मंत्रालयाने (MHA) याबाबत अधिसूचना जारी केली.
गृह मंत्रालयाच्या मते, राज भवन हा शब्द वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक असल्याने त्यात बदल करण्यात आला आहे.
त्यांच्यावर टीका केली, त्यांचा अपमानही केला
‘सेवा तीर्थ’ या नामांतराबाबत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, “आज देश आपली परंपरा जपत वेगाने पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा आवाज आणि प्रभाव जगभरात घुमतो आहे. दुसरीकडे देशाचा GDP देखील ८.५ टक्क्यांनी वाढत आहे. ते पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी संसदेत प्रवेश करताना स्वतःला सेवक आणि चौकीदार म्हणत नम्रपणे मस्तक झुकवले. लोकांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांचा अपमानही केला, पण देशाने मात्र त्यांना मनापासून स्वीकारले”.
पूर्वी झालेले नामांतर
२०१६ मध्ये पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ‘लोक कल्याण मार्ग’ असे नामांतरित करण्यात आले.
केंद्रीय सचिवालयाला ‘कर्मचारी भवन’ऐवजी ‘कर्तव्य भवन’ असे नाव देण्यात आले.
‘राजपथ’चे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ करण्यात आले.