

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रविवारी (दि. २६) प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. कर्नाटकातील ज्येष्ठ भाजप नेते असलेल्या जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, विद्यार्थी आंदोलनानंतर झालेल्या या बदलाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदल
धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर आपल्या राजीनाम्याची माहिती देताना देशभर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले होते. त्यांनी आपल्या संदेशात विद्यार्थ्यांनाही उद्देशून भावना व्यक्त केल्या होत्या.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांवर दोन्ही बाजूंमध्ये सामंजस्य झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
कर्नाटकातील अनुभवी नेते
२७ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्नाटकातील विजापूर येथे जन्मलेल्या प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण रेल्वे स्कूलमध्ये, त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे त्यांनी श्री काडसिद्धेश्वर आर्ट्स कॉलेज, हुबळी येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली.
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ते व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात सक्रिय भूमिका घेतली आणि कर्नाटकातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
सलग पाच वेळा खासदार
प्रल्हाद जोशी २००४ पासून धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी सलग पाच वेळा लोकसभेची निवडणूक जिंकत संसदेत आपले स्थान कायम ठेवले आहे.
महत्त्वाच्या मंत्रालयांचा अनुभव
२०१९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली.
हरित ऊर्जा मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांनी केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी केली. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, पीएम-कुसुम योजना तसेच देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढविणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.