
कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने आज (दि. १) निकाल दिला असून उद्या अर्थात २ ऑगस्ट रोजी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांच्या समोर २६ साक्षीदारांची उलटतपासणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, निकाल ऐकून प्रज्ज्वल रेवण्णा न्यायालयात रडायला लागला.
घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार
ही घटना २०२१ मध्ये हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊस येथे घडली होती. पीडित महिला (वय ४८) रेवण्णा कुटुंबियांच्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. प्रज्ज्वल रेवण्णाने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला आणि हे कृत्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डही केले. रेवण्णावर एकूण चार बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
निवडणुकीवेळी अश्लील व्हिडिओ व्हायरल
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आले. हासन मतदारसंघातून प्रज्ज्वल रेवण्णाला पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्याच्याशी संबंधित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन केली. SIT ने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि पुरावे गोळा करून दोषारोप सिद्ध केले. प्रज्ज्वल रेवण्णा २६ एप्रिल २०२४ ला जर्मनीहून परत आला. त्याला ३१ मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर जेडी(एस) पक्षाने त्याला निलंबित केले. निवडणुकीतही त्याचा पराभव झाला.
कसा झाला गुन्ह्याचा खुलासा?
प्रज्ज्वल रेवण्णाच्या माजी वाहनचालकाने प्रज्ज्वलच्या मोबाईलमधून व्हिडीओ पेन ड्राईव्हमध्ये घेऊन भाजप नेत्यांना दिला, ज्यामुळे प्रकरण उघडकीस आले. मात्र, व्हिडीओ सार्वजनिक केल्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
आता त्याला बलात्काराचा गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालय त्याला उद्या कोणती शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.