
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. या खटल्यात निर्दोष मुक्त झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची लष्करात पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांना कर्नल पदावर बढती मिळाली आहे. जवळपास १७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर आणि ९ वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांना सेवेत पुनर्स्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवले. तपासादरम्यान प्रसाद पुरोहित, भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली. १७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर ३१ जुलै २०२५ रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
पुरावे गोळा करण्यात अपयश
कर्नल पुरोहित यांच्यावर आरडीएक्स आणण्याचे आणि घरी बॉम्ब तयार करण्याचे आरोप करण्यात आले. तसेच त्यांच्यावर ‘अभिनव भारत’चा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, पुरावे गोळा करण्यात तपास यंत्रणांना अपयश आल्याने कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
कर्नल पदी बढती
निर्दोष मुक्तीनंतर लष्कराने त्यांच्यावर असलेली सेवेवरील बंदी उठवली. त्यांची फाइल दक्षिण कमांडकडे पाठवण्यात आली आणि पदोन्नतीसह इतर सेवा हक्क पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता त्यांना अधिकृतरीत्या कर्नल पदावर बढती मिळाली आहे.
१७ वर्षे चाललेल्या खटल्यानंतर आता प्रसाद पुरोहित यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आणि लष्कराकडून मान्यता मिळाली. मात्र, मालेगाव स्फोटातील पीडितांच्या सहा कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यांनी विशेष न्यायालयाचा निकाल रद्द करण्याची मागणी केली असून पुढील काही महिन्यांत यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.