
पाटणा : बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असतानाच राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय बुधवारी घोषित केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक न लढविता आपण जनसुराज्य पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी काम करणार अशल्याचे किशोर यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या व्यापक हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मी निवडणूक लढवणार नाही, पक्षानेच हा निर्णय घेतला आहे. मी पक्षात जे काम करीत आलो आहे, तेच सुरू ठेवणार. पक्षाच्या व्यापक हितासाठी मी संघटनात्मक काम करीत राहणार आहे. ते पुढे म्हणाले, मी जर स्वतः निवडणुकीला उभा राहिलो, तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यातून पक्ष संघटनेच्या कामाला फटका बसेल. त्यामुळे पक्षहितासाठी हा निर्णय घेतला आहे.
तीन याद्या जाहीर
प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, जर बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाचा विजय झाला, तर त्याचा राष्ट्रीय स्तरावर परिणाम होईल. मी आजवर अनेकदा पूर्ण खात्रीने सांगत आलो आहे की, माझ्या पक्षाला एक तर १५० हून अधिक जागा किंवा १० पेक्षाही कमी जागा मिळतील. यापेक्षा अन्य काही होण्याची शक्यता नाही. किशोर यांच्या पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
भाजपची टीका
भाजपने किशोर यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपच्या मते किशोर यांना माहिती आहे की जर त्यांनी निवडणूक लढवली, तर त्यांची अनामत रक्कम जप्त होईल आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढविण्यासाठी निर्धारित केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. जर कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीमध्ये एकूण मतांच्या एक-षष्ठांश मतेही मिळवता आली नाहीत, तर त्याच्याकडून जमा केलेली अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते.
सामूहिक निर्णय
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढविण्याऐवजी संपूर्ण बिहारमध्ये जनसुराज्य पक्ष उभारण्यावर आणि मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सामूहिक निर्णय पक्षाने घेतला. एकंदरीत विचार केल्यास, एका जागेवर निवडणूक लढवल्याने ते केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित झाले असते किंवा एकाच मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित झाले असते. ही त्यांच्या पक्षाची पहिलीच निवडणूक आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण प्रचार व्यवस्थित सांभाळणे आणि पक्षाची वाढ व
कल्याण सुनिश्चित करणे कठीण झाले असते. अल्प काळात एकच जागा जिंकण्यापेक्षा दीर्घकालीन यशासाठी मजबूत संघटनात्मक पाया घालणे जनसुराज्य पक्षासाठी अधिक महत्त्वाचे असू शकते.