
आज उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या स्पेशल एमपी-एमएलए न्यायाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. १७ वर्षे जुने असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमदसह ३ आरोपींना दोषी ठरवले, तसेच ७ आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले आहे.
२८ फेब्रुवारी २००६ रोजी बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेले उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर आहे. उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर कुटुंबासह त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.
२००७मध्ये मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ला उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर झालेल्या पोलीस तपासात आणखी ६ जणांची नवे समोर आली. यासंदर्भात आज अतिक अहमद, सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना न्यायालयाने दोषी ठरवले. तर अशरफसह ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.