पुण्यासाठी टेकऑफ करणार होते विमान, अचानक पायलटने उड्डाणास दिला नकार; कारण...

टेकऑफच्या काही मिनिटेआधी वैमानिकाने उड्डाण करण्यास नकार दिला. हे ऐकून प्रवासी आणि इंडिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापन चक्रावले...
पुण्यासाठी टेकऑफ करणार होते विमान, अचानक पायलटने उड्डाणास दिला नकार; कारण...

खराब हवामानाचा देशभरातील विमानसेवांना दररोज फटका बसतोय. पण, बुधवारी बिहारच्या पाटणा विमानतळावरील विमानसेवेवर अन्य एका कारणामुळे परिणाम झाला. पुण्याला जाणारे इंडिगोचे विमान उड्डाणाच्या तयारीत होते. पण, टेकऑफच्या काही मिनिटेआधी वैमानिकाने उड्डाण करण्यास नकार दिला. हे ऐकून प्रवासी आणि इंडिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापन चक्रावले. कोणालाच काही समजत नव्हते. याचे कारण विचारले असता पायलटने जे सांगितले ते दुःखद होते.

खरंतर, इंडिगोचे 6E126 हे विमान पुण्यासाठी बुधवारी दुपारी 1.25 टेक-ऑफ घेणार होते. पण, टेक ऑफच्या काही मिनिटेआधी, पायलटला फोन आला की त्याच्या आजीचे निधन झाले आहे. ही बातमी ऐकून त्याला धक्का बसला. यानंतर पायलटने विमान उडवण्यास नकार दिला. मानसिक संतुलन चांगले नाही, त्यामुळे विमान उडवण्यास असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर विमानात बसलेल्या सर्व 162 प्रवाशांना उतरवण्यात आले.

यानंतर इंडिगोने उड्डाणासाठी पर्यायी व्यवस्था केली. त्यात बराच वेळ गेला. पर्यायी पायलटची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. कंपनीने प्रवाशांना अल्पोपहार दिला. त्यानंतर अखेर 4.41 च्या सुमारास विमानाने पुण्यासाठी उड्डाण घेतले.

logo
marathi.freepressjournal.in