'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल

पंजाबमधील फाजिल्का येथे 'पुन्हा एकत्र राहू' असे सांगून बोलावलेल्या घटस्फोटित महिलेची हत्या झाल्याचा आरोप. घटनेआधी दोघांची इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर व्हायरल झाली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल
Published on

संसार मोडला होता, पण नातं पुन्हा जुळेल या आशेने ती पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायला गेली. मात्र, ही भेट तिच्या आयुष्यातील अखेरची ठरली. पंजाबमधील फाजिल्का येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकरणात महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्याच पूर्वाश्रमीच्या पतीवर आहे. या घटनेपूर्वी दोघांनी एकत्र बनवलेली इन्स्टाग्राम रील आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मृत महिलेची ओळख ४२ वर्षीय सरोज अशी झाली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी सरोजचा पूर्वाश्रमीचा पती गुरमीत सिंह याच्याशी घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गुरमीत सिंहने सरोजशी संपर्क साधून पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघे भेटले आणि सरोजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचा एक रीलही पोस्ट करण्यात आला.

व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हायरल होत असलेल्या रीलमध्ये सरोज आणि गुरमीत सिंह दुचाकीवरून प्रवास करताना दिसतात. दुचाकी गुरमीत सिंह चालवत असून, मागे बसलेली सरोज मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसते. काही क्षणांनी गुरमीत सिंहही कॅमेऱ्याकडे पाहत हाताने 'V' (व्हिक्टरी) साइन करताना दिसतो. या रीलच्या पार्श्वभूमीला 'याद तेरी बन गई सजना वे साडे सीने च नासूर' हे पंजाबी गाणं वाजत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच सरोजची हत्या झाल्याची माहिती समोर आल्याने ही रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

हत्येआधीची व्हायरल Reel पाहा

रीलनंतर हत्या केल्याचा आरोप

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रील शूट केल्यानंतर गुरमीत सिंह सरोजला गावाजवळील निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे धारदार शस्त्राने तिची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मेंढपाळामुळे उघडकीस आली घटना

दरम्यान, जवळच शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या एका मेंढपाळाला महिलेच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकू आला. तो घटनास्थळाकडे धावत येत असल्याचे पाहून आरोपी तेथून पसार झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मेंढपाळाने गावकऱ्यांना माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना घटनेची खबर दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर आरोपी गुरमीत सिंहला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम रीलचाही पुरावा म्हणून तपास केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रेम, विश्वास आणि नात्यांच्या नावाखाली घडलेल्या या धक्कादायक घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in