
ओडिशातील पुरी जिल्ह्यात रविवारी पहाटे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, तर ३० जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही दुर्घटना श्री गुंडीचा मंदिराजवळ रविवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. ओडिशा सरकारने कडक कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मंदिराबाहेर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. तसेच त्या ठिकाणी पुरेसे प्रशासन आणि सुरक्षा बल उपस्थित नसल्याचेही समोर आले आहे.
रथयात्रा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक मंदिर परिसरात जमले होते. याच गर्दीमध्ये विधी साहित्य घेऊन जाणारे दोन ट्रक अचानक घुसल्याने गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. मृतांमध्ये बसंती साहू (बोलागड), प्रेमकांत मोहंती आणि पार्वती दास (बालीपटना) यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कठोर आरोप केले आहेत. पुरीचे रहिवासी स्वाधीन कुमार पांडा म्हणाले, "मी रात्री २-३ वाजेपर्यंत मंदिराजवळ होतो, पण व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ होते. व्हीआयपींसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला होता, परंतु सामान्य भाविकांना गर्दीतून वाट काढावी लागत होती. एक्झिट गेटची व्यवस्था अत्यंत अपुरी होती आणि वाहतूक नियंत्रणही नव्हते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली."
मुख्यमंत्र्यांची तत्काळ कारवाई
घटनेची गंभीर दखल घेत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली आहे.
पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन आणि पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.
कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल डीसीपी विष्णुपती आणि कमांडंट अजय पाधी यांना निलंबित करण्यात आले आहे.
चंचल राणा यांची नवे जिल्हाधिकारी, तर पिनाक मिश्रा यांची नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून संवेदना व मदतीची घोषणा
या घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन माझी यांनी भाविकांची माफी मागत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. "महाप्रभू जगन्नाथाच्या सर्व भक्तांची मी आणि माझे सरकार क्षमा मागतो. या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या तीव्र संवेदना आहेत. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो," अशी संवेदना व्यक्त केली.