राज्यसभा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी भारतातील गिग वर्कर्सच्या रोजच्या अडचणी समजून घेण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. धोरणात्मक चर्चांपासून थोडा वेळ दूर राहून त्यांनी भारतातील क्विक-कॉमर्स कंपनी ब्लिंकइट (Blinkit) च्या डिलिव्हरी पार्टनरची भूमिका अनुभवली. राघव चड्ढा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संसदेतून थेट तळागाळातील लोकांपर्यंत...
राघव चड्ढा यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवारी (दि.१२) टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ते Blinkit चा टी-शर्ट, जॅकेट आणि हेल्मेट घालताना दिसतात. त्यानंतर ते एका ऑन-ड्युटी डिलिव्हरी पार्टनरकडून बॅग घेतात आणि त्याच्यामागे स्कूटीवर बसून ऑर्डरसाठी स्थानिक दुकानात जातात. ऑर्डर घेतल्यानंतर ते ग्राहकाच्या ठिकाणी पार्सल देण्यासाठी पोहोचतात. त्यानंतर, डिलिव्हरी पार्टनर लिफ्टमधून बाहेर पडतो आणि दाराची बेल वाजवतो, आणि राघव चड्ढा शांतपणे मागे उभे राहतात. व्हिडीओच्या शेवटी Stay tuned असा संदेश पाहायला मिळतो.
मी त्यांचा एक दिवस जगलो...
या व्हिडीओला चड्ढा यांनी “बोर्डरूमपासून दूर थेट ग्राउंड लेव्हलपर्यंत. मी त्यांचा एक दिवस जगलो. Stay tuned.” अशी कॅप्शन दिली आहे. यावरून लवकरच याचा सविस्तर व्हिडीओ किंवा अनुभव मांडला जाण्याची शक्यता आहे. हा ४० सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
गिग वर्कर्सच्या प्रश्नांवर याआधीही संसदेत आवाज
माहितीनुसार, चड्ढा यांनी संसदेत गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सच्या कामकाजाच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतरच हा ऑन-ग्राउंड प्रयोग आला आहे. कमी आणि अनिश्चित उत्पन्न, कामाचे जास्त तास, आरोग्य विम्याचा अभाव आणि सामाजिक सुरक्षेचा तुटवडा या मुद्द्यांवर त्यांनी याआधीही भूमिका मांडली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये Blinkit च्या एका डिलिव्हरी पार्टनरचा उत्पन्नावरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गिग वर्कवर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर चड्ढा यांनी उत्तराखंडचे थापलियाल जी या डिलिव्हरी पार्टनरची भेट घेतली आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर त्यांना घरी जेवणालाही बोलावले होते.