राहुल गांधींचा अमेरिकेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी यांचे संग्रहित छायाचित्र
राहुल गांधी यांचे संग्रहित छायाचित्रएक्स @RahulGandhi
Published on

बोस्टन : काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मोठी गडबड केली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सांगितले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रौढ व्यक्तींपेक्षा तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते, त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे घडणे केवळ अशक्य आहे. एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटे लागतात. हे गृहित धरले तर आकडेवारीनुसार, मतदार रात्री २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली, असे निष्पन्न होते. पण तसे कुठेही घडल्याचे पाहायला किंवा ऐकायला आले नाही.”

“आम्ही निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली गेली आहे का? याबाबत विचारल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि कायद्यातही बदल केला. याचा अर्थ सरळ आहे की, निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत, हे अगदी स्पष्ट झाले आहे. आम्ही हा मुद्दा अनेक वेळा माध्यमांद्वारे सार्वजनिकरित्या उपस्थित केला आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यमान केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

राहुल गांधी कोणाचा अजेंडा चालवतायत - फडणवीस

राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत. ते कोणाचा अजेंडा चालवत आहेत? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, “विदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन सेवा करावी. जनतेचा विश्वास संपादन केल्यास निवडणुकीत विजयी होण्याची संधी मिळेल. भारतीय लोकशाहीला बदनाम करणे, लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणे, हे अत्यंत चुकीचे काम ते करत आहेत. वारंवार निवडणूक हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे.”

logo
marathi.freepressjournal.in