

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष ‘सत्या’सोबत उभा आहे आणि ‘नरेंद्र मोदी-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार’ सत्तेतून हटवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले.
येथील रामलीला मैदानावर आयोजित ‘व्होट चोर, गद्दी छोडो’ या पक्षाच्या रॅलीला संबोधित करताना त्यांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांची नावे घेत, ते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडे ‘सत्ता’ आहे आणि ते ‘मतचोरी’ करतात.
निवडणुकांच्या काळात भाजपने १० हजार रुपये हस्तांतरित केले, मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. सत्य आणि असत्य यांच्यातील या लढाईत निवडणूक आयोग भाजप सरकारसोबत काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला संरक्षण देणारा नवा कायदा आणला आहे. आम्ही हा कायदा बदलू आणि निवडणूक आयुक्तांविरुद्ध कारवाई करू, असा इशारा गांधी यांनी दिला.
ते म्हणाले की, आमची, हिंदुस्थान, हिंदू धर्म व जगातील प्रत्येक धर्माचे विचार हे सत्य मानते. मात्र मोहन भागवत म्हणतात, सत्याचा काहीही उपयोग नाही. सत्ता गरजेची आहे. पण, आम्ही सत्याच्या पाठीशी राहून नरेंद्र मोदी, अमित शहा व संघाच्या सरकारचा पराभव करू, याची गॅरंटी मी देतो, असे त्यांनी सांगितले.