Video : रेल्वेतील चादर-टॉवेल चोरू नका! AC प्रवाशांना कर्मचाऱ्याची विनंती; म्हणाला- 'आमच्या पोटावर पाय कशाला...'

रेल्वेच्या AC डब्यातील चादरी, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला गेल्यास त्याची भरपाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून केली जाते, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. १४ हजारांच्या पगारातून ५ हजार रुपये कपात झाल्याची व्यथा कर्मचाऱ्याने मांडली.
Video : रेल्वेतील चादर-टॉवेल चोरू नका! AC प्रवाशांना कर्मचाऱ्याची विनंती; म्हणाला- 'आमच्या पोटावर पाय कशाला...'
Published on

मुंबई : रेल्वेच्या एसी डब्यात प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या चादरी, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, या चोरीचा फटका थेट रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारावर बसतो, हे अनेकांना माहिती नसते. अशाच एका रेल्वे कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपली व्यथा मांडत प्रवाशांना रेल्वेचे साहित्य न चोरण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

'चादरी चोरून आमच्या पोटावर पाय देऊ नका'

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अमित यादव नावाचा रेल्वे कर्मचारी एसी डब्यातील प्रवाशांना चादरी, ब्लँकेट आणि टॉवेल वाटण्याचे तसेच प्रवास संपल्यानंतर ते परत गोळा करण्याचे काम करत असल्याचे सांगतो.

मात्र, अनेक प्रवासी हे साहित्य सोबत घेऊन जातात. त्यामुळे संबंधित वस्तू हरवल्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर येते आणि त्याची रक्कम त्यांच्या पगारातून वसूल केली जाते. त्यामुळेच, "कृपया रेल्वेच्या चादरी आणि टॉवेल चोरून आमच्या पोटावर पाय देऊ नका," अशी भावनिक विनंती त्याने केली आहे.

१४ हजार पगारातून कपात

अमित यादव यांच्या म्हणण्यानुसार, त्याचा मासिक पगार सुमारे १४ हजार रुपये आहे. एखादा टॉवेल हरवल्यास ६० रुपये, चादर हरवल्यास १५० रुपये, तर ब्लँकेट हरवल्यास ७०० रुपये त्यांच्या पगारातून कापले जातात.

इतकेच नाही, तर एका महिन्यात मोठ्या प्रमाणात साहित्य गायब झाल्यामुळे त्यांच्या पगारातून तब्बल ५ हजार रुपयांची कपात झाल्याचाही अनुभव त्याने सांगितला.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी कर्मचाऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत, रेल्वेचे साहित्य चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही नेटकऱ्यांनी, "एसी तिकीटासाठी हजारो रुपये खर्च करणारे काही प्रवासी ६० रुपयांचा टॉवेल किंवा चादर चोरतात, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे," अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दुसऱ्या व्हिडिओत प्रवासी रंगेहाथ पकडला

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यामध्ये एसी डब्यातील रेल्वेचे ब्लँकेट आणि इतर साहित्य सोबत नेत असलेल्या एका प्रवाशाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याचे दिसते.

या घटनेनंतरही सार्वजनिक मालमत्ता चोरणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे

सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण गरजेचे

रेल्वेतील चादरी, ब्लँकेट आणि टॉवेल ही सार्वजनिक मालमत्ता असून ती सर्व प्रवाशांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिली जाते. अशा वस्तू घरी नेल्यामुळे केवळ रेल्वेचे नुकसान होत नाही, तर त्याची आर्थिक झळ संबंधित कर्मचाऱ्यांनाही बसू शकते. त्यामुळे प्रवाशांनी जबाबदारीने वागून सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in