

राजस्थान : देवदर्शन करून घरी परतताना एका कुटुंबावर काळाने घाला घातला. राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्वजण राजस्थानमधील खाटू श्यामजी मंदिरात दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत होते. चित्तोडगड जिल्ह्यातील शंभूपुरा गावाजवळ रविवारी (दि. २२) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
उभ्या ट्रकला क्रुझरची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील १५ सदस्य क्रुझर गाडीतून प्रवास करत होते. त्यांची गाडी वेगात असताना महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवताना चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू
या अपघातात उषा बाई, सुशीला, कैलास, सान्वी, सज्जन, अनिता, बाबूलाल, जान्हवी आणि माधवी यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना रुग्णवाहिकेतून न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, जखमींच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
पोलिसांकडून बचावकार्य; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस आणि बचाव पथकाने अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच अन्य प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तीन गाड्यांमधून ३६ नातेवाईकांचा प्रवास
या कुटुंबातील सदस्य तीन वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास करत होते. खाटू श्यामजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते मध्य प्रदेशातील धारच्या दिशेने निघाले होते. या तिन्ही गाड्यांमध्ये मिळून ३६ नातेवाईक होते. अपघातग्रस्त क्रुझर गाडी इतर दोन गाड्यांच्या पुढे निघाली होती, तर उर्वरित दोन गाड्या मागे राहिल्या होत्या.
दरम्यान, अपघाताची माहिती कुटुंबातील एका सदस्याला फोनवरून मिळाली. त्यानंतर मागे असलेल्या गाड्यांमधील नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त
राजस्थानमधील या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. धुळे जिल्ह्यातील भाविक खाटू श्यामजी देवस्थानाचं दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दुःखद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच, अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.