

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात राजस्थानमधील प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ महेश्वरी (६२) यांचा मृत्यू झाला. जयपूरहून मथुराकडे धार्मिक प्रवासासाठी निघाले असताना राजस्थानमधील अलवर शहराजवळ त्यांच्या आलिशान बीएमडब्ल्यू कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, शकुन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (MD) वल्लभ महेश्वरी हे रविवारी (दि.८) जयपूरहून मथुराकडे जात होते. त्यावेळी अलवर जिल्ह्यातील रेणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचा ताबा सुटला.
त्यानंतर, गाडीने रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडत मधल्या डिव्हायडरला धडक दिली आणि पुढे जाऊन पुलाच्या भिंतीवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातानंतर महेश्वरी आणि चालकाला तातडीने पिनान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अलवर येथील हरिश रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान वल्लभ महेश्वरी यांना मृत घोषित केले. या अपघातात चालक सुदैवाने बचावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक तपासात अतिवेग किंवा वाहनातील तांत्रिक बिघाड ही अपघाताची संभाव्य कारणे असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महेश्वरी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जयपूर येथे पाठवण्यात आला आहे.
वल्लभ महेश्वरी कोण होते?
वल्लभ महेश्वरी हे जयपूरस्थित शकुन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या उद्योगसमूहाने जाहिरात, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे.
व्यवसाय व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांना ३२ वर्षांहून अधिक अनुभव होता. एसजीएम बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (SGM Buildcon Private Limited), शकुन कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (Shakun Communication Infrastructure Private Limited), शकुन अॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड (Shakun Advertising Private Limited) आणि मनोकामना रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड (Manokamna Real Estate Private Limited) यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले होते.
राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत म्हटले की, अलवरमधील रेणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात उद्योगपती वल्लभ महेश्वरी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
दरम्यान, पोस्टमॉर्टम अहवालानंतर अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.