संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरून पाकिस्तानला इशारा; भविष्यात पाकिस्तानने काहीही प्रयत्न केल्यास..

भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबले असले तरी पाकिस्तानने पुन्हा भारताविरोधी पाऊल टाकू नये अथवा तसे करताना भारतीय सैन्य त्यासाठी कायम सज्ज आहे असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. आज गोवा येथे त्यांनी थेट नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरुन पाकिस्तानला खडसावले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरून पाकिस्तानला इशारा; भविष्यात पाकिस्तानने काहीही प्रयत्न केल्यास..
Published on

भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबले असले तरी पाकिस्तानने पुन्हा भारताविरोधी पाऊल टाकू नये अथवा तसे करताना भारतीय सैन्य त्यासाठी कायम सज्ज आहे असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. आज गोवा येथे त्यांनी थेट नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरुन पाकिस्तानला खडसावले आहे. ''जर नौदल या लढाईत उतरले तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील'' असा सज्जड दम राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला दिला.

गोवा येथे नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरुन सैन्य जवानांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, की जर या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाने थेट सहभाग घेतला असता, तर पाकिस्तानला १९७१ च्या तुलनेत अधिक गंभीर परिणाम भोगावे लागले असते. १९७१ मध्ये जेव्हा भारतीय नौदल कारवाईत उतरले, तेव्हा पाकिस्तान दोन भागांत विभागले गेले. पण, जर ऑपरेशन सिंदूरदरम्यान नौदलही उतरले असते, तर पाकिस्तान चार भागांत विभागले गेले असते."

भारतीय बनावटीच्या INS विक्रांतला भेट देताना राजनाथसिंह यांनी नौदलाच्या ऑपरेशनल सज्जतेचा आढावा घेतला. त्यांनी नौदलाच्या आक्रमक तैनातीचे आणि सागरी वर्चस्वाचे विशेष कौतुक करत पाकिस्तानच्या नौदल मालमत्तेला किनाऱ्यांपुरते मर्यादित ठेवण्यामध्ये नौदलाच्या मूक पण प्रभावी सहभागाचे वर्णन केले.

ते पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय नौदलाने गोळी न झाडता, शत्रूला चकित केले. तुमची तैनाती, सज्जता आणि ताकद पाहून पाकिस्तानने स्वतःच माघार घेतली.

संरक्षणमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की पाकिस्तानचे सुदैव आहे की यावेळी नौदलाने थेट लढाईत सहभाग घेतला नाही. जर विक्रांत कॅरियर बॅटल ग्रुपची संपूर्ण क्षमता वापरली गेली असती, तर पाकिस्तानचे भविष्य अजून गंभीर झाले असते.

पुढे संरक्षणमंत्र्यांनी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून सांगितले, आज तुम्ही इथे उभे आहात, ते फक्त नावासाठी नाही, तर विक्रांत म्हणजे 'अदम्य धैर्य आणि अजिंक्य शक्ती' हे जगाला दाखवण्यासाठी. तुमचा दृढनिश्चयच भारताची खरी शक्ती आहे.

भारत सरकारच्या निवेदनानुसार, INS विक्रांतच्या नेतृत्वाखालील कॅरियर बॅटल ग्रुपने (CBG) ऑपरेशन सिंदूरदरम्यान सागरी वर्चस्व राखण्यात निर्णायक भूमिका बजावली. मिग-२९के लढाऊ विमाने आणि AEW विमाने यांसह सुसज्ज या नौदल पथकाने पाकिस्तानच्या नौदलाला त्यांच्या बंदरातच अडकवून ठेवले.

ते म्हणाले, पाकिस्तानने हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की स्वातंत्र्यापासून ते खेळत असलेला दहशतवादाचा धोकादायक खेळ आता संपला आहे. आता जेव्हा जेव्हा पाकिस्तान भारताविरुद्ध कोणताही दहशतवादी हल्ला करेल तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतीलच, पण प्रत्येक वेळेप्रमाणे त्याला पराभवालाही सामोरे जावे लागेल.

सिंह यांनी येणाऱ्या काळात नौदलाला सतत सज्ज राहण्याचे आवाहन करत म्हटले, जोपर्यंत तुमची तयारी शिखरावर असेल, तोपर्यंत शत्रू कधीही डोके वर काढू शकणार नाही. भविष्यात पाकिस्तानने काहीही प्रयत्न केल्यास यावेळी नौदल थेट कारवाईत उतरेल आणि त्या नंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे पाकिस्तानची असेल.

logo
marathi.freepressjournal.in