ग्राहकांची फसवणूक करणे रॅपिडो कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आणून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) प्रसिद्ध रॅपिडो कंपनीला १० लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच जाहिरातीमध्ये दिलेल्या ऑफरचा लाभ न झालेल्या ग्राहकांना सदर पैसे विनाविलंब परत करण्याचेही निर्देश दिले आहेत.
रॅपिडोची फसवी जाहिरात
रॅपिडो कंपनीने '५ मिनिटात रिक्षा अन्यथा ५० रुपये मिळवा' ही जाहिरात प्रसारित केली होती. मात्र, ही जाहिरात फसवी निघाली. रॅपिडोने जाहिरातीमध्ये '"T&C Apply' हा डिस्क्लेमर अत्यंत लहान आणि वाचता न येणाऱ्या फॉन्टमध्ये लिहिला होता. तर, ग्राहकांना ५ मिनिटात रिक्षा मिळाली नाही, तर जो ५० रुपयांचा परतावा मिळणार होता, तोही प्रत्यक्ष पैशांत अथवा Online Cashback नसून 'रॅपिडो कॉइन्स' स्वरूपात होता. इतकेच नव्हे, तर या नाण्यांची वैधता केवळ ७ दिवसांची होती आणि त्यांचा उपयोग फक्त रॅपिडो बाईक राईड्सवरच करता येत होता.
याशिवाय, जाहिरातींमध्ये ५० रुपयांची हमी दाखवली असली तरी अटींनुसार ती जबाबदारी रॅपिडो कंपनीची नसून चालकाची असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे जाहिरातींमध्ये दिलेल्या आश्वासनांमध्ये आणि अटींमध्ये स्पष्ट विरोधाभास असल्याचे CCPA ला आढळले. त्यामुळे ही जाहिरात तात्काळ बंद करण्याचे तसेच ग्राहकांना अटीप्रमाणे त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्राहकांची रॅपिडोकडून फसवणूक; तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ
यासोबतच, ग्राहकांची वाढती तक्रार पाहता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो कंपनीच्या व्यवहारांचा तपास केला. या तपासात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) च्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२३ ते मे २०२४ दरम्यान रॅपिडोविरुद्ध ५७५ तक्रारी, तर जून २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत तब्बल १२२४ तक्रारी नोंदल्याचे समोर आले. या तक्रारींमध्ये सेवा उशिरा मिळणे, जास्त शुल्क आकारणे, वचन दिलेल्या सुविधा न देणे आणि परतावा न मिळणे यांचा समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांत रॅपिडोविरुद्ध तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून अशा जाहिरातींचा प्रसार देशभरातील १२० अधिक शहरांमध्ये झपाट्याने होत आहे. यामुळेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार CCPA ला ही कारवाई करावी लागली.
मोठ्या आश्वासनांना बळी पडू नका
मोठी आश्वासने देणाऱ्या पण अटी स्पष्ट न करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहावे, असे आवाहन CCPA ने ग्राहकांना केले आहे. तसेच, ग्राहकांना अनुचित व्यापार पद्धतींचा अनुभव आल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (१९१५), NCH ॲप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.