

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर करण्यात आलेल्या सुरक्षा सरावादरम्यान (मॉक ड्रिल) एक गंभीर त्रुटी उघडकीस आली आहे. सुरक्षा यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी केलेल्या या मॉक ड्रिलमध्ये एक 'डमी बॉम्ब' सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटून थेट लाल किल्ल्याच्या आतमध्ये पोहोचला. या प्रकारामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात लाल किल्ल्यावर नियोजित मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. या सरावादरम्यान, पोलिसांच्या एका विशेष पथकाला डमी बॉम्ब घेऊन लाल किल्ल्यात प्रवेश करण्याचे निर्देश देण्यात आले होते. उद्देश हाच होता की, सुरक्षेत नेमकी किती सतर्कता आहे याची चाचणी घेणे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, हे पथक कोणतीही अडचण न येता मुख्य प्रवेशद्वार पार करत थेट परिसरात पोहोचले आणि एकाही सुरक्षारक्षकाने डमी बॉम्ब ओळखला नाही.
हा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सुरक्षा तपासणीमध्ये डमी बॉम्ब ओळखला न गेल्याने ही अतिशय गंभीर चूक ठरते. देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्व असलेल्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेतील ही त्रुटी चिंताजनक आहे."
या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत दिल्ली पोलिसांनी तातडीने ७ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर सुरक्षेत आणखी सुधारणा आणि कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधान स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडा फडकावतात आणि देशाला संबोधित करतात. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेतील अशा प्रकारची त्रुटी ही अत्यंत गंभीर मानली जात आहे.