

सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा उत्साह एका तरुणाच्या आयुष्यावर बेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे. उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाजवळ रील शूट करताना स्लॅब डोक्यावर कोसळल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रील शूट करताना घडला अपघात
नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिजौरिया रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाजवळ ही घटना घडली. मोहम्मद फैजान (वय २२) असे या तरुणाचे नाव असून तो रिचोला गावचा रहिवासी आहे. शुक्रवारी संध्याकाळी तो मित्र अनुजसोबत त्या ठिकाणी गेला होता. तिथे दोघांनी रील शूट करण्याचा निर्णय घेतला.
स्लॅबवर चढताच तोल गेला अन्...
रस्त्याच्या कडेला रचलेले मोठे काँक्रीट स्लॅब्स दिसताच फैजानने 'ड्रामॅटिक शॉट' घेण्यासाठी त्यावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने तो घसरला. याच क्षणी एक जड स्लॅब हलून थेट त्याच्या डोक्यावर कोसळला. जोरदार आघातामुळे फैजानचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रस्त्याने जाणारे लोक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फैजानच्या कुटुंबीयांना घटनेबद्दल सांगण्यात आले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं फैजानचे वडील मेहंदी हसन यांनी सांगितलं.
सोशल मीडियावरील धोकादायक ट्रेंडवर प्रश्नचिन्ह
हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाल्याने व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावरील धोकादायक स्टंट्स आणि रील्ससाठी घेतल्या जाणाऱ्या जोखमीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पाहा व्हिडिओ
तज्ज्ञ आणि प्रशासनाने यापूर्वीही बांधकामस्थळांवर रील्स किंवा व्हिडीओ शूट करणे धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. अशा ठिकाणी अस्थिर साहित्य, जड यंत्रसामग्री आणि अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. बांधकाम क्षेत्रात परवानगीशिवाय प्रवेश करणे कायदेशीरदृष्ट्याही चुकीचं असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
व्हायरल ट्रेंडपेक्षा स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या- पोलिसांचे आवाहन
पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणांना सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंडपेक्षा स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणं कधीच योग्य नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोकादायक सवयींचा हा प्रकार भीषण परिणाम दाखवून देणारा ठरत आहे.