७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित या चित्ररथातून परंपरा, संस्कृती आणि स्वावलंबन यांचा प्रभावी संगम सादर करण्यात आला.
परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम
महाराष्ट्राच्या चित्ररथामधून गणेशोत्सवाचा ऐतिहासिक प्रवास उलगडून दाखवण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले, तेथून ते आजच्या काळात स्थानिक कारागीर, कुटीर उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या उत्सवापर्यंतचा प्रवास या चित्ररथातून प्रभावीपणे मांडण्यात आला.
चित्ररथाच्या समोरील बाजूस पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. तर मागील भागात पेण आणि पुण्यातील कारागिरांच्या नाजूक कलाकुसरीचे दर्शन घडवण्यात आले. या सादरीकरणातून गणेशोत्सवामुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेला कसा आधार मिळतो, हे ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.
ढोल-ताशांचा गजर; राजधानीत महाराष्ट्राची ऊर्जा
चित्ररथासोबत ढोल-ताशा पथकांच्या तालावर सादर झालेल्या स्फूर्तिदायक सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. मुंबई आणि पुण्याच्या सांस्कृतिक ऊर्जेचा ठसा थेट देशाच्या राजधानीत उमटताना पाहायला मिळाला.
प्रजासत्ताक दिन संचलनातील ठळक वैशिष्ट्ये
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अनेक ऐतिहासिक बाबी पाहायला मिळाल्या. युरोपियन युनियनचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन हे यंदाच्या संचलनाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सादरीकरण करण्यात आले.
संचलनात भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी ‘बॅटल अॅरे’ रचना सादर करण्यात आली. यासोबतच स्वदेशी संरक्षण क्षमतेचे प्रतीक असलेली दीर्घ पल्ल्याची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे दाखवण्यात आली.
गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले गट कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. यामुळे प्रजासत्ताक दिनाचे संचलन अधिक भव्य आणि लक्षवेधी ठरले.