
नवी दिल्ली : कर्नाटकमधील सरकारी कंत्राटामध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी या आरक्षणाला विरोध केला आहे. आपले संविधान धर्मावर आधारित आरक्षणाला परवानगी देत नाही, त्यामुळे असे आरक्षण अस्वीकारार्ह आहे. तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या हे विरुद्ध आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बाहेरच्या लोकांना आदर्श मानण्यापेक्षा या मातीतील लोकांना आदर्श माना. काही लोकांनी औरंगजेबाला त्यांचा आयकॉन बनवले. असे लोक औरंगजेबाच्या भावाविषयी काहीही बोलत नाहीत. त्यामुळेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आदर्श ठरवायचे की इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान करायचा, हा खरा प्रश्न आहे, असे होसबळे म्हणाले.
औरंगजेबाची कबर उखडण्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच, संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भाजपचे कान टोचले होते. मात्र, आता सरकार घेत असलेली भूमिका योग्य असल्याचे दत्तात्रय होसबळे यांनी म्हटले आहे. “आक्रमक मानसिकतेचे लोक भारतासाठी संकट आहेत. अशाच प्रवृत्तीचे लोक औरंगजेबाचे महत्त्व वाढवत आहेत. वक्फ बोर्डबाबत सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहेत. तसेच अयोध्येत झालेले राम मंदिर हे फक्त संघ नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे,” असेही होसबळे यांनी सांगितले.
यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरमध्ये झालेल्या हिंसा आणि दंगलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही’, असे मत सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले होते. बंगळुरूमध्ये लवकरच संघाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होणार आहे. यावेळी औरंगजेबाच्या कबरीबाबत काय चर्चा होणार, याची चर्चा सुरू आहे.
“बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्या विरोधात आम्ही संघाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अन्याय, त्यांच्या विरोधात कट करून केली जाणारी हिंसा, त्यांच्यावरचे अन्याय तसेच शोषण याबाबत आम्ही निषेध नोंदवला आहे. हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे आणि एकजूट करून राहिले पाहिजे,” असे मत होसबळे यांनी व्यक्त केले. यावेळी संघप्रमुख मोहन भागवत, सरचिटणीस दत्तात्रय होसाबळे, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासह संघाशी संबंधित ३२ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
‘संघटित हिंदू समाज’: संघाचा संकल्प
जगात शांती आणि समृद्धी आणण्याच्या उद्देशाने एक सुसंवादी आणि संघटित हिंदू समाज निर्माण करण्याचा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत केला. तीन दिवसांच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. “हिंदू समाजाला आपली जागतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘धर्मा’वर आधारित आत्मविश्वासाने भरलेले संघटित आणि सामूहिक जीवन आवश्यक आहे. प्राचीन आणि समृद्ध संस्कृती असलेल्या भारत देशाकडे एकसंध जग निर्माण करण्याचे अद्भूत ज्ञान आहे. संपूर्ण मानवजातीला विभाजन आणि विनाशाच्या प्रवृत्तींपासून वाचवणे आणि सर्व प्राण्यांमध्ये शांती आणि एकतेची भावना वाढवणे हे उद्दिष्ट आहे,’’ असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.