श्रीनगर : भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या पार्श्वभूमीनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये काही प्रमाणात स्थैर्य परतले होते. शाळा, महाविद्यालये आणि सामान्य जनजीवन सुरळीत होत असतानाच, दहशतवाद्यांच्या हालचालींनी पुन्हा एकदा खोऱ्यात तणाव निर्माण केला आहे.
मंगळवार, १३ मे रोजी सकाळपासून शोपियान जिल्ह्यातील झिनपथर-केलर परिसरात गोळीबाराच्या आवाजाने खळबळ माजली. सुरक्षा दलांनी तत्काळ कारवाई करत लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आणखी काही दहशतवादी परिसरात लपलेले असण्याची शक्यता असून, शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती एएनआयच्या वृत्तानुसार मिळाली आहे.
या चकमकीची सुरुवात कुलगाम जिल्ह्यात झाली होती. मात्र, दहशतवाद्यांनी पळ काढताच ही कारवाई शोपियानपर्यंत वाढली. गेल्या ११ दिवसांतील ही पहिली मोठी चकमक असल्याने सुरक्षा दलांसाठी ही एक महत्त्वाची मोहीम मानली जात आहे.
दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाखांचे बक्षीस
२२ एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्याबाबत पाकिस्तानी दहशतवादी आदिल हुसेन ठोकर, अली आणि हाशिम मुसा यांच्यावर संशय असून, ते अद्याप फरार आहेत.
या पार्श्वभूमीवर शोपियान जिल्ह्यात विविध ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे पोस्टर्स लावल्यानंतर दहशतवादी गटांच्या हालचालींना वेग आला असून, त्यांच्यावर कारवाईसाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. संपूर्ण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.