
गुजरातच्या राजकारणात सध्या एक नाव सर्वत्र चर्चेत आहे, रिवाबा जडेजा. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी म्हणून घराघरात ओळख निर्माण करणारी रिवाबा आता गुजरात सरकारमध्ये मंत्री झाली आहे. केवळ तीन वर्षांच्या राजकीय प्रवासात तिने हे यश मिळवले. मंत्रिमंडळातील रिवाबाच्या नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्याने रिवाबा प्रथमच प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली होती. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता, रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. त्या क्षणी संपूर्ण स्टेडियम आनंदात न्हावून निघाले. त्यानंतर मैदानावर घडलेले दृश्य मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. रिवाबा रवींद्रकडे धावत आली आणि सर्वप्रथम ती वाकून त्याच्या पाया पडली. संस्कारी पत्नीच्या या रूपाची चर्चा सर्वत्र झाली आणि त्या क्षणानंतर ‘रिवाबा जडेजा’ हे नाव घराघरात पोहोचले.
अभियंता ते राजकारणी
५ सप्टेंबर १९९० रोजी जन्मलेल्या रिवाबाचा जन्म एक समृद्ध कुटुंबात झाला. वडील हरदेवसिंह सोलंकी हे यशस्वी उद्योजक, तर आई प्रफुल्लाबा सोलंकी भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राजकोटमधील आत्मीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथून तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.
रिवाबा एकेकाळी यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती. याच काळात ती रवींद्र जडेजाची बहीण नैना जडेजा हिच्या ओळखीतून रवींद्रला भेटली. मैत्रीतून सुरू झालेलं हे नातं लवकरच प्रेमात बदललं आणि १७ एप्रिल २०१६ रोजी दोघांनी राजेशाही थाटात लग्न केलं.
...पण रिवाबाचा कल भाजपकडे
रिवाबाच्या राजकीय वाटचालीतील एक वेगळेपणा म्हणजे तिचं कुटुंब काँग्रेसशी निगडित असलं तरी तिने भाजपमध्ये प्रवेश केला. ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिसिंह सोलंकी यांची नातेवाईक आहे. मात्र, रिवाबाने स्वतःचा मार्ग वेगळा निवडला. २०१९ मध्ये तिने जामनगरमध्ये तत्कालीन कृषी मंत्री आर. सी. फालदू आणि खासदार पूनम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी ती करणी सेनेच्या महिला शाखेच्या प्रमुख पदावर कार्यरत होती.
राजकारणात दमदार एंट्री
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिवाबाने संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला. महिला सक्षमीकरणासाठी ती 'श्री मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट' ही संस्था चालवते. २०२२ मध्ये रिवाबाने जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाली. फक्त तीन वर्षांच्या काळात आमदारपदापासून थेट मंत्रिपदापर्यंत पोहोचणं हे तिच्या राजकीय प्रवासाचं मोठं यश मानलं जातं.
आता ‘मिसेस जडेजा’ नव्हे, 'मंत्री रिवाबा जडेजा’
आता रिवाबा फक्त क्रिकेटपटूची पत्नी म्हणून नव्हे, तर राजकारणातील एक प्रभावशाली चेहरा म्हणून ओळखली जाते. रिवाबा या आधी केवळ रवींद्र जडेजाची पत्नी म्हणून ओळखली जात होती. मात्र, आता मंत्रीपदाच्या कारकिर्दीला झालेली सुरुवात तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंटच ठरला आहे.