

चेन्नई : सरसंघचालक (रा.स्व.संघ) मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत बुधवारी भाष्य केले. चेन्नई येथे राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी बोलताना भागवत यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असणार असा सवाल भागवत यांना विचारण्यात आला. मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, 'स्वत: मोदी आणि भाजप याबाबत चर्चा करून उत्तराधिकाऱ्याविषयी निर्णय घेतील', असे भागवत म्हणाले.
तामिळनाडूमध्ये १०० टक्के राष्ट्रवादी विचारांची भावना
यावेळी, तामिळनाडूमधील लोकांमध्ये १०० टक्के राष्ट्रवादी विचारांची भावना आहे. परंतु बाह्य कृत्रिम शक्ती या लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात रोखत आहेत. या लोकांचे काम देशभावना संपुष्टात आणण्याच्या दिशेने सुरू आहे. तामिळनाडूची जनता संस्कृती, पंरपरा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित आहे. या मूल्यांना आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना भागवत यांनी बोलून दाखवली.
मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना भाषेची विविधता आणि संस्कृतीवरही विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या लोकांना मातृभाषेत बोलण्याचा आग्रह करत पारंपरिक जीवनशैली कायम ठेवण्याचाही सल्ला दिला. 'तुम्ही तामिळ भाषेत सही करताना का डगमगता, असेही ते म्हणाले. भारतातील सर्व भाषांचे महत्वही भागवत यांनी अधोरेखित केले.