गोकर्णच्या घनदाट जंगलातील गुहेत दोन मुलींसह सापडली रशियन महिला; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामतीर्थ डोंगररांगेच्या घनदाट जंगलात एक रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसोबत एका नैसर्गिक गुफेत राहत असल्याचे उघडकीस आले. स्थानिक पोलिसांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोधमोहीमेत या महिलेचा शोध लागला असून, तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
russian-woman-found-gokarna-cave-with-daughters
Published on

कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामतीर्थ डोंगररांगेच्या घनदाट जंगलात एक रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसोबत एका नैसर्गिक गुफेत राहत असल्याचे उघडकीस आले. स्थानिक पोलिसांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोधमोहीमेत या महिलेचा शोध लागला असून, तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

या रशियन महिलेचे नाव नीना कुटिना असून, तिचे वय ४० वर्षे आहे. ती आपल्या सहा वर्षांच्या प्रेमा आणि चार वर्षांच्या अमा या दोन मुलींसोबत गुहेत एकांतात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीना कुटिना ही रशियन नागरिक असून, तिचा व्हिसा २०१७ सालीच संपलेला होता. तिचे भारतातील वास्तव्य बेकायदेशीर ठरत असल्यामुळे तिला रशियात परत पाठवण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे.

असा लागला महिलेचा शोध -

ही घटना पोलिसांच्या गस्तीदरम्यान उघडकीस आली. गोकर्ण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीधर एस.आर. हे आपल्या पथकासह रामतीर्थ डोंगर परिसरात गस्त घालत असताना एका गुफेजवळ काही हालचाली आढळल्या. त्यांना मातीमध्ये लहान मुलांच्या पायांचे ठसे आढळले. भूस्खलनप्रवण क्षेत्र असल्याने त्यांचा संशय वाढला. जेव्हा त्यांनी गुफेच्या परिसराची पाहणी केली, तेव्हा त्यांना नीना आणि तिच्या दोन मुली तिथे वास्तव्यास असल्याचे दिसून आले.

का राहत होती गुहेत?

नीना सुरुवातीला काहीही सांगण्यास तयार नव्हती. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका स्थानिक महिलेला बोलवण्यात आले. तिला नीनाने सगळी हकीकत सांगितली. तिने सांगितले, की ती अध्यात्मिक ओढीने भारतात आली होती. तिला ध्यानधारणा करण्यासाठी एकांत हवा होता. त्यासाठी ती आधी गोव्यात गेली. तिथून तिने गोकर्ण गाठले. तिला ही नैसर्गिक गुहा सापडली. या गुफेला तिने आपले निवासस्थान बनवले. तिने ध्यान करण्यासाठी गुफेमध्ये रुद्राची मूर्तीही स्थापन केली आहे. ती रोज ध्यान करत असे.

या परिसरात विषारी साप, जंगली प्राणी आणि पावसाळ्यात होणारे भूस्खलन यामुळे धोका असतानाही ती तिथे राहत होती.

२०१७ साली व्हिसा संपूनही भारतात वास्तव्य -

नीनाचे म्हणणे होते की तिचे पासपोर्ट आणि व्हिसाचे कागदपत्र हरवले आहेत. मात्र, पोलिसांनी गुफेतील झाडाझडतीत ते कागदपत्र सापडले. कागदपत्रांनुसार, ती १८ ऑक्टोबर २०१६ रोजी भारतात आली होती आणि तिचा व्हिसा १७ एप्रिल २०१७ रोजी संपलेला होता. तिला २०१८ मध्ये पनाजी येथील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाकडून Exit Permit ही दिला गेला होता. या काळात ती नेपाळ आणि जपानलाही गेली होती आणि पुन्हा ती भारतात आली.

पोलिसांनी नीनाला गुहा सोडण्यास सांगितले. मात्र, सुरुवातीला ती तयार नव्हती. पोलिसांनी तिला तेथील हिंस्र श्वापदांची असलेली भीती आणि वारंवार होणाऱ्या भूस्खलनाची माहिती देऊन समजूत काढली. त्यामुळे ती तयार झाली. आता ती आणि तिच्या दोन मुलींना कुमटा तालुक्यातील बांकीकोडला गावातील स्वामी योगरत्न सरस्वती यांच्या देखरेखीतील आश्रमात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी बेंगळुरूतील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाला या घटनेची माहिती दिली असून, तिच्या निर्वासनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रशियन दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे.

ही घटना उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या वर्षांपासून ही महिला गुफेत कशी राहत होती? तिने काय खाल्ले, तिच्या मुलांचे आरोग्य कसे होते? याचा तपास अजूनही सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, पुढील कार्यवाही लवकरच होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in