''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि. २६) सुनावणी घेतली. या खटल्याच्या योग्यतेवरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी
Published on

रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि. २६) सुनावणी घेतली. या खटल्याच्या योग्यतेवरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने समीर वानखेडे यांना मुंबईतील हा खटला दिल्लीत का दाखल केला? असा सवाल केला.

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी विचारले, की मुंबईतील घटनांशी संबंधित हा खटला दिल्लीत का चालवायचा? राष्ट्रीय राजधानीत याची सुनावणी होण्यासाठी कोणते कायदेशीर आधार आहेत?

सुनावणीदरम्यान वानखेडे यांच्या वतीने वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी सांगितले, दिल्लीसह संपूर्ण भारतात प्रेक्षक ही सिरिज पाहतात. त्यामुळे माझ्या आशिलांची (वानखेडे यांची) प्रतिमा खराब होत आहे. यावर न्यायमूर्ती कौरव म्हणाले की, “जर हा खटला दिल्लीत चालवायचा असेल, तर याचिकेत सुधारणा करून त्यामागील कारणे स्पष्ट करा.”

नेमके प्रकरण काय?

आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या सिरिजमध्ये एका पात्राचे चित्रण आपल्यासारखे असल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे चित्रण खोटे आणि बदनामीकारक असून त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होत आहे.

त्यांनी संबंधित सिरिजमधील कथित दृश्य हटवावे, सिरिजवर मनाई आदेश द्यावा, भविष्यात त्यांच्या विरोधात आणखी बदनामीकारक मजकूर प्रकाशित करू नये अशा मागण्या न्यायालयाकडे केल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. तसेच, त्यांनी २ कोटींची नुकसानभरपाई द्यावी अशीही मागणी केली आहे.

२०२१ मध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून कार्यरत असताना वानखेडे यांनी मुंबईत झालेल्या ड्रग्ज छाप्यात आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाला मोठे राजकीय व सामाजिक वळण मिळाले होते. वानखेडे यांच्या मते, नव्या सिरिजद्वारे त्यांची थट्टा करून आणि त्यांच्यासारखे पात्र दाखवून जनतेसमोर नकारात्मक प्रतिमा निर्माण केली जात आहे. शिवाय, या सिरिजमुळे अंमली पदार्थविरोधी संस्थांवर जनतेचा विश्वास ढळण्याची शक्यता आहे.

सध्या न्यायालयाने वानखेडे यांना याचिकेत सुधारणा करून दिल्लीमध्ये खटला चालवण्याचा कायदेशीर आधार स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच पुढील सुनावणी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in