
दिल्ली-पडघा ISIS दहशतवादी गटाच्या मॉड्यूल प्रकरणातील मुख्य आरोपी साकिब अब्दुल हमिद नाचन याचे शनिवारी ब्रेन स्ट्रोकमुळे दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात निधन झाले. साकिब नाचनला २०२३ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) अटक केली होती, त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. त्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे सांगितले होते. चार दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचे वकील समशेर अन्सारी यांनी त्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिली आहे.
SIMI आणि ISIS दहशतवादी संघटनांचा संबंध -
साकिब हा 'स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' (SIMI) या भारतात बंदी असलेल्या संघटनेचा प्रमुख सदस्य होता. त्याचे नाव २००२-०३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व मुलुंडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये समोर आले होते. या स्फोटांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता तर शंभराहून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्याने २०१७ पर्यंत तुरुंगवास भोगला. त्यानंतर त्याला सोडण्यात आले.
२०२३ मध्ये पुन्हा अटक
२०२३ मध्ये NIA ने साकिब नाचन याला पुन्हा अटक केली. या वेळेस त्याला दिल्ली-पडघा ISIS मॉड्यूल प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पकडण्यात आले. त्याच्यावर दिल्ली आणि महाराष्ट्रातील पडघा परिसरातील ISIS गटाशी संबंधित असल्याचे आरोप होते. NIA च्या तपासानुसार, नाचन या गटाचा एक महत्त्वाचा भाग होता. तो भारतीय उपमहाद्वीपातील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर तरुणांना कट्टरपंथी बनवणे, गटासाठी कार्यकर्त्यांची भरती करणे आणि संपूर्ण देशभर विशेषतः महाराष्ट्रात या संघटनेचा विस्तार घडवून आणण्याचा आरोप होता.
साकिब नाचन याच्या घरावर अलीकडेच भिवंडी आणि बोरिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी ATS ने छापेमारी केली होती. छापेमारीमध्ये त्याच्या घरी काही संशयास्पद वस्तू आणि दस्तऐवज मिळाल्याचे सांगण्यात आले. यामुळे नाचनचे दहशतवादी गटाशी असलेले संबंध अधिक स्पष्ट होण्याची शक्यता होती. त्याच्या मृत्यूने त्याच्या दहशतवादी गटाशी असलेल्या धागेदोऱ्यासंबंधी अधिक तपासाची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना अधिक चौकशी करावी लागणार आहे.