
मुंबई: गेल्या आठवड्यात निर्देशांक पातळीत फेरफार केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील वित्तसंस्था ‘जेन स्ट्रीट’वर कारवाई करण्यात आली. आता देशातील डेरिव्हेटिव्हज बाजारावर ‘सेबी’ची कडक देखरेख राहील परंतु या टप्प्यावर साप्ताहिक निर्देशांक समाप्ती रोखण्याचा विचार करत नाही, असे प्रतिपादन सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी सोमवारी सांगितले.
गेल्या आठवड्यात सेबीच्या एका आदेशात ‘जेन स्ट्रीट’ या वित्तसंस्थेने सुमारे ४,८०० कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पांडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, सेबी आपली देखरेख यंत्रणा अधिक सुधारण्याचा विचार करत आहे. ‘जेन स्ट्रीट’ या वित्त संस्थेने केलेल्या बाजारातील छेडछाडीप्रमाणे इतर फारशी जोखीम बाजारात दिसत नाही. जेन स्ट्रीट प्रकरण ‘मूलतः’ एक देखरेखीचा मुद्दा होता आणि यामुळेच नियामक यावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे, असे ते म्हणाले.
जेन स्ट्रीटविरोधात सुरू असलेल्या कारवाईविषयी ते म्हणाले की, ही कारवाई विद्यमान नियामक अधिकारांच्या मर्यादेत केली जात आहे. चुकीच्या कृत्यांवर कारवाई करण्यासाठी केवळ नियामक अधिकार नव्हे, तर अधिक चांगली देखरेख आणि अंमलबजावणी आवश्यक आहे, असे त्यांनी सुचवले.
गुरुवारी पहाटे जाहीर झालेल्या आदेशात, सेबीने ‘जेन स्ट्रीट’ या न्यूयॉर्कस्थित हेज फंडने एकाच वेळी ‘कॅश व फ्युचर्स अँड ऑप्शन्स’ (F&O) मार्केटमध्ये व्यवहार करून निर्देशांकात छेडछाड केल्याचे निष्कर्ष काढले.
डेरिव्हेटिव्हज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी मासिक एक्स्पायरीचा पर्याय विचारात असल्याच्या सूचनांवर पांडे म्हणाले की, असा कोणताही निर्णय सध्या विचाराधीन नाही.
ते म्हणाले की, डेरिव्हेटिव्हज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही पुढील पावले केवळ आकडेवारीच्या आधारेच उचलण्यात येतील. अलीकडील हस्तक्षेपांमुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या नुकसानीत काही फरक पडला आहे का, याबाबत पांडे म्हणाले की, सेबी लवकरच मागील तीन महिन्यांतील डेरिव्हेटिव्हज मार्केटमधील किरकोळ गुंतवणूकदारांच्या कामगिरीविषयी सविस्तर आकडेवारी प्रसिद्ध करेल.
९० टक्के गुंतवणूकदारांना तोटा
सेबीच्या अभ्यासात आढळले होते की ९० टक्क्यांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांचे व्यवहार नुकसानकारक ठरले होते, यामुळे काही विशिष्ट उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
सेबीने जेन स्ट्रीटला बाजारात प्रवेश करण्यापासून निलंबित केले असून, ४,८४३ कोटी रुपयांहून अधिकचा नफा जप्त केला आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२५ या काळात जेन स्ट्रीटने एकूण ३६,६७१ कोटी रुपयांचा नफा कमावला.